व्हिडिओ पाहण्यासाठी

देव खरंच आहे का?

देव खरंच आहे का?

बायबलचं उत्तर

 हो, देव आहे याचा ठोस पुरावा बायबलमध्ये आपल्याला सापडतो. बायबल सांगतं की धर्मांमध्ये जे शिकवलं जातं, त्यावर आपण डोळे मिटून विश्‍वास ठेवू नये; तर आपण आपल्या ‘विचारशक्‍तीचा’ आणि ‘समजशक्‍तीचा’ उपयोग करून देवावर विश्‍वास ठेवला पाहिजे. (रोमकर १२:१; १ योहान ५:२०, तळटीप) खाली दिलेल्या काही गोष्टींवर विचार करा:

  •   या विश्‍वात सगळं काही किती सुव्यवस्थित आहे हे पाहून कळतं की एक निर्माणकर्ता आहे. बायबल म्हणतं: “प्रत्येक घर कोणी ना कोणी बांधलेलं असतं. पण ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या तो देव आहे.” (इब्री लोकांना ३:४) ही गोष्ट साधी वाटत असली, तरी बऱ्‍याच सुशिक्षित लोकांना ती पटते. a

  •   माणसांना मुळातच जीवनाचा अर्थ आणि त्याचा उद्देश समजून घ्यायची इच्छा असते. जशी आपल्याला भूक लागते आणि आपण अन्‍न खातो तशीच हीपण एक प्रकारची भूकच आहे. आणि अन्‍न खाल्यावरही ही भूक भागत नाही. बायबल याला “देवाच्या मार्गदर्शनाची भूक” असं म्हणतं. ते सांगतं की माणसांमध्ये मुळातच देवाला जाणून घेण्याची आणि त्याची उपासना करण्याची इच्छा असते. (मत्तय ५:३; प्रकटीकरण ४:११) माणसांमध्ये मुळातच असलेल्या या इच्छेवरून हे सिद्ध होतं की देव अस्तित्वात आहे. इतकंच नाही तर यावरून हेही दिसून येतं की तो एक प्रेमळ निर्माणकर्ता आहे. आणि आपण त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करावा आणि ही भूक भागवावी असं त्याला वाटतं.​—मत्तय ४:४.

  •   बायबलमध्ये बऱ्‍याच भविष्यवाण्या दिल्या आहेत. या भविष्यवाण्या कित्येक शतकांआधी लिहून ठेवण्यात आल्या होत्या. पण त्यांतली एकूण एक गोष्ट जशीच्या तशी पूर्ण झाली. या सगळ्यावरून दिसून येतं की या भविष्यवाण्या कोणत्याही माणसाकडून नव्हत्या तर त्या देवाकडून होत्या.​—२ पेत्र १:२१.

  •   बायबलच्या लेखकांनी अशी बरीच माहिती लिहिली, जी विज्ञानाप्रमाणे अगदी बरोबर आहे आणि जी त्यांच्या काळातल्या लोकांना माहीत नव्हती. उदाहरणार्थ, जुन्या काळातले बरेच लोक असं मानायचे की पृथ्वी हत्तीवर किंवा बैलावर टेकलेली आहे. याउलट बायबल म्हणतं की देवाने “पृथ्वीला निराधार टांगलंय.” (ईयोब २६:७) तसंच, पृथ्वीच्या आकाराबद्दलही लोकांच्या मनात बरेच गैरसमज होते. पण बायबलमध्ये अगदी अचूकपणे सांगितलंय की पृथ्वीचा आकार ‘गोल’ आहे. (यशया ४०:२२) जुन्या काळात या सगळ्या गोष्टींचा शोध लागला नसतानाही, बायबलच्या लेखकांना ही माहिती कुठून मिळाली? बरेच लोक असं मानतात की साहजिकच ही माहिती त्यांना देवाकडून मिळाली असेल.

  •   बायबलमध्ये गोंधळात टाकणाऱ्‍या बऱ्‍याच प्रश्‍नांची उत्तरं दिली आहेत. सहसा जेव्हा एखाद्या व्यक्‍तीला या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत, तेव्हा ती व्यक्‍ती नास्तिक बनू शकते. यांपैकी काही प्रश्‍न म्हणजे: जर देव प्रेमळ आणि सर्वशक्‍तिमान आहे तर मग जगात इतकं दुःख का? धर्माच्या नावाखाली आज इतक्या वाईट गोष्टी का केल्या जातात?​—तीत १:१६.

a खगोलशास्त्रज्ञ ॲलन सॅन्डेज एकदा या विश्‍वाबद्दल असं म्हणाले होते: “एका गोंधळाच्या स्थितीतून हे सुव्यवस्थित विश्‍व अस्तित्वात येऊ शकतं, ही गोष्ट मला अगदीच अशक्य वाटते. या सगळ्या गोष्टींना एकमेकांशी इतकं व्यवस्थितपणे जोडणारं काहीतरी असलंच पाहिजे. देव आहे की नाही हे तर मला माहीत नाही. पण या विश्‍वातल्या आश्‍चर्यकारक रचना शून्यातून कशा काय अस्तित्वात आल्या, या प्रश्‍नाचं दुसरं कोणतंच उत्तर सापडत नाही.”