व्हिडिओ पाहण्यासाठी

येशूमुळे तारण कसं मिळतं?

येशूमुळे तारण कसं मिळतं?

बायबलचं उत्तर

 येशूने आपलं जीवन खंडणी बलिदान म्हणून अर्पण केलं, तेव्हा त्याने विश्‍वासू मानवांसाठी तारणाचा मार्ग मोकळा केला. (मत्तय २०:२८) म्हणूनच बायबलमध्ये येशूला “जगाचा तारणकर्ता” म्हटलंय. (१ योहान ४:१४) त्यात असंही म्हटलंय: “तारण आणखी कोणाच्याही द्वारे मिळणं शक्य नाही, कारण ज्याद्वारे आपलं तारण होऊ शकेल, असं आकाशाखाली माणसांमध्ये दुसरं कोणतंही नाव नाही.”​—प्रेषितांची कार्यं ४:१२.

 येशूने त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या “सर्वांसाठी मृत्यूचा अनुभव घेतला.” (इब्री लोकांना २:९; योहान ३:१६) मग “देवाने त्याला मेलेल्यांतून उठवलं” आणि तो एक अदृश्‍य व्यक्‍ती म्हणून स्वर्गात परत गेला. (प्रेषितांची कार्यं ३:१५) येशू स्वर्गात गेल्यामुळे आता “त्याच्याद्वारे देवाजवळ येणाऱ्‍यांचं पूर्णपणे तारण करणंही त्याला शक्य आहे. कारण त्यांच्याकरता याचना करण्यासाठी तो सर्वदा जिवंत आहे.”​—इब्री लोकांना ७:२५.

येशूने आपल्यासाठी याचना करण्याची गरज का आहे?

 आपण सगळेच पापी आहोत. (रोमकर ३:२३) पापामुळे आपल्यामध्ये आणि देवामध्ये एक प्रकारचा दुरावा निर्माण झालाय आणि यामुळे आपल्याला मृत्यूचा सामना करावा लागतो. (रोमकर ६:२३) पण जे येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवतात त्यांच्या “वतीने बोलणारा” या नात्याने तो त्यांना साहाय्य करतो. (१ योहान २:१, तळटीप) तो त्यांच्यासाठी याचना करतो, म्हणजेच देवाने त्यांच्या प्रार्थना ऐकाव्यात आणि खंडणी बलिदानाच्या आधारावर त्यांच्या पापांची क्षमा करावी अशी तो देवाकडे विनंती करतो. (मत्तय १:२१; रोमकर ८:३४) येशूने केलेल्या या याचना देवाच्या इच्छेप्रमाणे असल्यामुळे देव त्या स्वीकारतो. देवाने येशूला या पृथ्वीवर, “त्याच्याद्वारे जगाचं तारण व्हावं म्हणून पाठवलं.”​—योहान ३:१७.

तारण होण्यासाठी फक्‍त येशूला मानणंच पुरेसं आहे का?

 नाही. तारण मिळण्यासाठी आपण येशूला मानलं तर पाहिजे, पण एवढंच पुरेसं नाही. (प्रेषितांची कार्यं १६:३०, ३१) बायबल म्हणतं: “शरीर ज्याप्रमाणे श्‍वासाशिवाय निर्जीव आहे, त्याप्रमाणे विश्‍वाससुद्धा कार्यांशिवाय निर्जीव आहे.” (याकोब २:२६) तारण होण्यासाठी, आपण:

  •   येशूबद्दल आणि त्याच्या पित्याबद्दल म्हणजेच यहोवाबद्दल शिकून घेतलं पाहिजे.​—योहान १७:३.

  •   त्यांच्यावर असलेला विश्‍वास वाढवत राहिला पाहिजे.​—योहान १२:४४; १४:१.

  •   त्यांच्या आज्ञांप्रमाणे वागून आपला विश्‍वास दाखवून दिला पाहिजे. (लूक ६:४६; १ योहान २:१७) कारण येशूने शिकवलं की त्याला “प्रभू” म्हणणाऱ्‍या सगळ्यांचंच तारण होणार नाही, तर फक्‍त ‘स्वर्गातल्या त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करणाऱ्‍यांचंच’ तारण होईल.​—मत्तय ७:२१.

  •   कठीण परिस्थिती आली तरी कार्यांतून आपला विश्‍वास दाखवत राहिला पाहिजे. कारण येशूने अगदी स्पष्टपणे सांगितलं: “जो शेवटपर्यंत धीर धरेल त्यालाच वाचवलं जाईल.”​—मत्तय २४:१३.