व्हिडिओ पाहण्यासाठी

आत्महत्या करण्यापासून वाचले

आत्महत्या करण्यापासून वाचले

यहोवाचे दोन साक्षीदार घरोघरचे साक्षकार्य करत होते. त्यांनी जेव्हा एका दारावरची बेल वाजवली तेव्हा एका मनुष्याने दार उघडले. पण तो मनुष्य खूप निराश दिसत होता. आणि त्याच्या मागे घरात पायऱ्‍यांवर एक दोर लोंबताना दिसत होता.

या मनुष्याने साक्षीदारांना घरात बोलवले. हा दोर असा का लोंबतोय, असे साक्षीदारांनी त्याला विचारले तेव्हा त्याने त्यांना सांगितले, की तो गळफास लावून घेणार होता इतक्यात दारावरची बेल वाजली. कोण आले आहे हे शेवटी एकदाचे पाहून घेऊ या म्हणून त्याने दार उघडले. साक्षीदार त्याच्याशी बोलले व त्याला डॉक्टरांकडेही नेले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले.

ही बातमी एका बेल्जियन वर्तमानपत्रात छापून आली. पण यहोवाच्या साक्षीदारांनी, आत्महत्या करणाऱ्‍या व्यक्‍तीला मदत केल्याची ही पहिलीच वेळ नव्हती. जगभरातील अनेक भागांत असे अनुभव त्यांना आले.

ग्रीस येथील एका स्त्रीने असे लिहिले: “माझा सोबती माझ्याशी अमानुषपणे वागला होता. त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले. मला इतका मानसिक त्रास होत होता, की मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. जीवन संपवण्याच्या विचारानेच मला हायसे वाटले. मला ती मानसिक यातना नको होती.”

पण झाले असे, की ती स्त्री डॉक्टरांकडे गेली. आणि त्यानंतर काही दिवसांतच तिने साक्षीदारांबरोबर संपर्क साधला. तिने बायबल अभ्यास करायला सुरुवात केली व त्यांच्या सभांना जाऊ लागली. ती लिहिते: “मी इतकी वर्षं ज्याच्या शोधात होते ते निःस्वार्थ प्रेम मला इथं मिळालं. शिवाय मला खरे मित्र मिळाले आहेत ज्यांच्यावर मी भरवसा ठेवू शकते. आता मला शांत वाटतं, मी आनंदी आहे आणि मला भविष्याची मुळीच चिंता नाही.”

इंग्लंड येथील एका साक्षीदार बहिणीने लिहिले: “माझ्या एका ओळखीच्या स्त्रीनं मला कॉल केला. ती खूप टेन्शनमध्ये वाटत होती. मला तिनं सांगितलं, की ती रात्री आत्महत्या करणार आहे. मग मी, मे २००८ अवेक! मधील एका लेखामधून काही मुद्दे सांगून तिच्याशी तर्क केला आणि बायबलमधून काही वचनं वाचून दाखवली. त्यानंतर, समस्या असूनही आता तिच्या मनात असे भलते-सलते विचार येत नाहीत.”

घाना येथील मायकल नावाच्या एका यहोवाच्या साक्षीदाराची, त्याच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या एका स्त्रीशी ओळख झाली. एकदा मायकलला जाणवले, की ही स्त्री खूप दुःखी आहे आणि त्याने तिला त्याचे कारण विचारले.

तिने त्याला सांगितले, की तिचा नवरा तिला सोडून दुसऱ्‍या एका स्त्रीबरोबर राहायला गेला असल्यामुळे ती खूप निराश झाली होती. मायकलने तिचे सांत्वन केले आणि शास्त्रवचनांबद्दलचे स्पष्टीकरण देणारी दोन पुस्तके तिला वाचायला दिली. पुस्तकांतील माहिती वाचून तिच्या डोक्यातून आत्महत्येचा विचार निघून गेला. या स्त्रीने बायबलचा अभ्यास सुरू केला आणि आज ती यहोवाची साक्षीदार आहे.

अमेरिका येथील एका वर्तमानपत्रात, एका तरुण साक्षीदाराने एका स्त्रीचे व तिच्या तीन लहान मुलांचे जीव कसे वाचवले याबद्दलची एक बातमी आली होती. या तरुणाने रस्त्याच्या कडेला पार्क केलेली एक कार पाहिली जिचे इंजिन चालू होते.

त्याने म्हटले: “मी, कारच्या एक्झॉस्ट पाईपमध्ये हेअर ड्रायर घातल्याचे पाहिले. ड्रायरची वायर खिडकीतून आत घेतली होती व खिडकी टेपने गच्च बंद केली होती.

“मी पळतच कारजवळ गेलो. आत डोकावून बघितलं तर, एक स्त्री रडत होती. कारमध्ये खूप धूर जमला होता. मी जोरानं ओरडलो: ‘काय करताय तुम्ही?’

“मी दार उघडायचा प्रयत्न करत होतो तेव्हा मला कारच्या मागच्या सीटवर तीन लहान मुलं बसलेली दिसली. मी दार उघडलं. पण ती स्त्री म्हणाली: ‘मला नाही जगायचं. आणि मी माझ्या पोरांनाही सोबत नेईन.’

“मी तिला म्हणालो: ‘नका, असं करू नका.’

“ती म्हणाली: ‘मला स्वर्गात जायचंय. आणि सोबत माझ्या मुलांनाही न्यायचंय.’

“ती खूप रडत होती. मी गुडघ्यांवर वाकलो. मलाही रडू आवरत नव्हतं. पुन्हा मी तिला म्हणालो: ‘प्लीज असं करू नका.’ असं बोलून मग मी तिच्या हाताला धरून हळूहळू तिला कारच्या बाहेर यायला मदत केली.

“बाहेर आल्यावर ती जोरात ओरडू लागली: ‘माझ्या मुलांनापण वाचवा.’

“तेसुद्धा लगेच माझ्याकडे झेपावले. त्यांपैकी, ४ आणि ५ वर्षांच्या दोन मुली होत्या आणि २ वर्षांचा एक मुलगा होता. ते कारच्या मागच्या सीटवर गपचूप बसले होते. ते आणखी थोडा वेळ या कारमध्ये बसले असते तर मेले असते याची जराही त्यांना जाणीव नव्हती.

“सर्वांना बाहेर सुखरूप काढल्यावर मी कारचं इंजिन बंद केलं. मग आम्ही पाचही जण, बाजूलाच असलेल्या एका दगडी भिंतीवर बसलो. मी त्या स्त्रीला म्हणालो: ‘आता बोला माझ्याशी.’”

आपल्याला मिळालेले जीवन ही निर्माणकर्त्याकडून मौल्यवान देणगी आहे, असे यहोवाचे साक्षीदार मानतात. आत्महत्या करून ज्यांनी आपले जीवन संपवले आहे अशा लोकांच्या प्रिय जनांना पुनरुत्थानाच्या आशेबद्दल सांगून ते सांत्वन देतात व आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्‍यांना मदत करतात.