व्हिडिओ पाहण्यासाठी

तुम्ही नाताळ साजरा का करत नाही?

तुम्ही नाताळ साजरा का करत नाही?

सर्वसामान्य गैरसमजुती

 असत्य: यहोवाचे साक्षीदार नाताळ साजरा करत नाहीत कारण ते येशूला मानत नाहीत.

 सत्य: यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती आहेत. तारण हे केवळ येशू ख्रिस्ताद्वारेच मिळणार आहे असे ते मानतात.—प्रेषितांची कृत्ये ४:१२.

 असत्य: नाताळ साजरा करू नका असे सांगून ते कुटुंबांमध्ये फुटी पाडतात.

 सत्य: यहोवाच्या साक्षीदारांना कुटुंबांबद्दल काळजी आहे आणि कुटुंबांमधील बंधने मजबूत करण्याकरता ते बायबलचा उपयोग करतात.

 असत्य: नाताळ सणादरम्यान लोकांप्रती दाखवण्यात येणारी उदारतेची, शांतीची आणि सदिच्छा बाळगण्याची भावनाच तुम्ही गमावता.

 सत्य: यहोवाचे साक्षीदार उदारतेची भावना दाखवतात व इतरांबरोबर शांतीने राहण्याचा नेहमी प्रयत्न करतात. (नीतिसूत्रे ११:२५; रोमकर १२:१८) उदाहरणार्थ, यहोवाचे साक्षीदार चालवत असलेल्या सभा आणि ते करत असलेले प्रचार कार्य येशूच्या या सूचनेनुसार आहे: “तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या.” (मत्तय १०:८) त्याचबरोबर, ते देवाचे राज्यच पृथ्वीवर शांती आणणार आहे या गोष्टीकडे लोकांचे लक्ष वेधतात.—मत्तय १०:७.

यहोवाचे साक्षीदार नाताळ साजरा का करत नाहीत?

  •   आपण येशूचा जन्मदिवस नाही तर त्याचा मृत्युदिवस साजरा करावा अशी त्याने आज्ञा दिली.—लूक २२:१९, २०.

  •   येशूच्या प्रेषितांनी आणि सुरुवातीच्या शिष्यांनी नाताळ साजरा केला नव्हता. न्यू कॅथलिक एन्सायक्लोपीडिया  म्हणतो, “नाताळ हा सण इ.स. २४३ च्या नंतरच,” म्हणजे शेवटल्या प्रेषिताचा मृत्यू होऊन एक शतकापेक्षा अधिक कालावधीनंतर साजरा करण्यास सुरुवात झाली.

  •   येशूचा जन्म २५ डिसेंबरला झाला होता याचा कोणताही पुरावा नाही; त्याच्या जन्माची तारीख बायबलमध्ये कोठेच देण्यात आलेली नाही.

  •   नाताळ हा सण देवाला मान्य नाही कारण त्याचा उगम मूर्तिपूजक प्रथा व रीतिरिवाजांतून आहे असे यहोवाचे साक्षीदार मानतात.—२ करिंथकर ६:१७.

तुम्ही नाताळ सणाचा इतका बाऊ का करता?

 नाताळ सणाची सुरुवात मूर्तिपूजेच्या प्रथेतून झाली आहे आणि बायबलमध्ये त्याचा कोठेही उल्लेख नाही हे माहीत असूनही बहुतेक लोक तो साजरा करतात. लोक कदाचित असे विचारतील: ख्रिश्‍चनांनी नाताळ सणाचा इतका बाऊ का करावा?

 बायबल आपल्याला आपल्या विचारशक्‍तीचा उपयोग करून सत्य व असत्य यांत “पारख” करण्याचे उत्तेजन देते. (रोमकर १२:१, २, पं.र.भा.) जे सत्य आहे ते मानण्यास बायबल आपल्याला शिकवते. (योहान ४:२३, २४) त्यामुळे, लोक आमच्याबद्दल काय म्हणतात याचा आम्ही विचार करतो; पण बायबल तत्त्वांचे पालन करण्याच्या बाबतीत मात्र आम्ही तडजोड करत नाहीत.

 यहोवाचे साक्षीदार जरी नाताळ साजरा करत नसले, तरी इतरांच्या निर्णयाचा ते आदर करतात. इतर जण नाताळ साजरा करतात तेव्हा ते त्यांच्या आनंदात विरजण घालत नाहीत.