व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा | दावीद

“हे युद्ध परमेश्वराचे आहे”

“हे युद्ध परमेश्वराचे आहे”

दाविदाला ढकलून सैनिक पळत होते, पण तो ठाम उभा होता. रणांगणातून पळताना सैनिकांच्या डोळ्यात भीती होती. त्यांच्या या भीती मागचं कारण काय होतं? ते घाबरून सतत एकाच माणसाचं नाव घेत होते. तो माणूस दरीत उभा होता. दाविदाने याआधी असा उंच, धिप्पाड माणूस कधीच पाहिला नव्हता.

त्या माणसाचं नाव होतं गल्याथ! दाविदाला आता कळलं, की सैनिक का घाबरले होते. तो इतका अवाढव्य आणि उंच होता की, त्याच्या शस्त्रांशिवाय त्याचं वजन दोन माणसां इतकं होतं. तो एक सशस्त्र, ताकदवान आणि अनुभवी योद्धा होता. गल्याथाने पुन्हा एकदा इस्राएली लोकांना ललकारलं. राजा शौलाला आणि इस्राएली सैन्याला चिडवणारा त्याचा मोठा आवाज त्या डोंगरात कसा घुमत असेल याची कल्पना करा. तो इस्राएली सैनिकांना ललकारत होता की, त्यांच्यापैकी कुणी एकाने यावं आणि त्याच्याशी लढावं. त्या दोघांमध्ये जो जिंकेल त्यावरून युद्धाचा निर्णय लागणार होता.—१ शमुवेल १७:४-१०.

इस्राएली लोक घाबरले होते. राजा शौलही घाबरला होता. दाविदाला कळलं की गेल्या एका महिन्यापासून पलिष्टी आणि इस्राएली एकमेकांसमोर युद्धासाठी उभे होते आणि गल्याथ रोज इस्राएली सैन्याला चिडवत होता. दाविदाला या गोष्टीचं फार वाईट वाटलं. कारण इस्राएलचा राजा, त्याचं सैन्य आणि त्यात असलेले दाविदाचे तीन मोठे भाऊ, या सर्वांनी घाबरणं ही फार लाजिरवाणी गोष्ट होती. दाविदाच्या मते हा खोट्या देवतांचा उपासक फक्त इस्राएली सैन्याला चिडवत नव्हता, तर तो इस्राएलच्या देवाचा, म्हणजेच यहोवाचा अपमान करत होता! पण दाविदासारखा मुलगा त्याचं काय वाकडं करू शकणार होता? आज आपण दाविदाच्या विश्वासावरून काय शिकू शकतो?—१ शमुवेल १७:११-१४.

“त्यास अभिषेक कर, हाच तो आहे”

पण या घटनेच्या काही महिन्यांआधी काय घडलं ते पाहू या. बेथलेहेमच्या डोंगरांमध्ये दावीद एका संध्याकाळी आपल्या वडिलांच्या मेंढरांचा सांभाळ करत होता. तो किशोर वयात असलेला, देखणा मुलगा होता. त्याचा वर्ण तांबूस आणि डोळे खूप सुंदर होते. त्याला वेळ मिळायचा तेव्हा तो वीणा वाजवत असे. देवाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या सौंदर्याने प्रभावित होऊन तो गायचा. अनेक तास सराव केल्यामुळे तो कुशल संगीतकार झाला होता. पण त्या संध्याकाळी त्याच्या वडिलांनी त्याला लवकर घरी बोलावलं.—१ शमुवेल १६:१२.

दावीद घरी आला तेव्हा त्याचे वडील इशाय, एका वृद्ध माणसासोबत बोलत होते. तो संदेष्टा शमुवेल होता. यहोवाने त्याला इशायाच्या मुलांपैकी एकाला इस्राएलचा नवीन राजा म्हणून अभिषेक करण्याकरता पाठवलं होतं. शमुवेल दाविदाच्या सात मोठ्या भावांना भेटला पण यहोवाने शमुवेलाला स्पष्ट सांगितलं की, त्याने त्यांपैकी कुणालाच निवडलं नव्हतं. पण जेव्हा दावीद घरी आला तेव्हा यहोवा शमुवेलाला म्हणाला: “त्यास अभिषेक कर, हाच तो आहे.” दाविदाच्या सर्व मोठ्या भावांसमोर, शमुवेलाने शिंगात भरून आणलेलं खास तेल त्याच्या डोक्यावर ओतलं. राजा म्हणून अभिषेक झाल्यावर दाविदाचं आयुष्य पार बदलून गेलं. बायबलमध्ये म्हटलं आहे: “त्या दिवसापासून पुढे दाविदावर यहोवाचा आत्मा येत राहिला.”—१ शमुवेल १६:१, ५-११, १३.

दाविदाने जंगली प्राण्यांना मारल्याचं श्रेय यहोवाला देऊन नम्रता दाखवली

अभिषेक झाल्यावर दाविदाच्या मनात लगेच राजा बनण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली का? नाही. राजा म्हणून जबाबदारी कधी स्वीकारायची, याबद्दल यहोवाकडून निर्देशन मिळेपर्यंत वाट पाहण्यात तो समाधानी होता. आणि या काळात त्याने मेंढरांचा सांभाळ करण्याचं आपलं काम चालू ठेवलं. त्याने आपलं हे काम मनापासून आणि धाडसाने केलं. दोनदा त्याच्या वडिलांच्या मेंढरांवर हल्ला झाला. एकदा एका सिंहाने आणि एकदा अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. दाविदाने या दोन्ही प्राण्यांना फक्त दुरून हाकललं नाही. तर तो लगेच त्या असहाय्य मेंढरांचं संरक्षण करण्यासाठी पुढे गेला. दोन्ही वेळा त्याने त्या जंगली प्राण्यांना एकट्यानेच मारलं.—१ शमुवेल १७:३४-३६; यशया ३१:४.

थोडा काळ गेल्यानंतर दाविदाला पुन्हा बोलावलं गेलं. या वेळी त्याची चर्चा राजा शौलापर्यंत पोहचली होती. शौल अजून एक शक्तिशाली योद्धा असला, तरी यहोवाच्या निर्देशनांविरूद्ध जाऊन त्याने बंड केल्यामुळे यहोवाची मर्जी गमावली होती. त्यामुळे यहोवाने शौलावरून आपला आत्मा काढून घेतला होता. आता शौलावर एका वाईट आत्म्याचा प्रभाव होता आणि त्यामुळे तो रागीट, संशयी आणि हिंसक बनला होता. जेव्हा तो वाईट आत्मा शौलावर येत असे तेव्हा त्याला संगीत ऐकल्याने शांत वाटत असे. शौलाच्या काही सेवकांना कळलं की दावीद चांगला संगीतकार आणि शूर व्यक्ती होता. त्यामुळे दाविदाला शौलाच्या राजदरबारात बोलावलं गेलं आणि लवकरच तो त्याच्या दरबारातील संगीतकारांमध्ये आणि शस्त्रवाहकांमध्ये सामील झाला.—१ शमुवेल १५:२६-२९; १६:१४-२३.

दाविदाने या सर्व बाबतीत जो विश्वास दाखवला त्यापासून तरुण खूप काही शिकू शकतात. त्याने आपल्या रिकाम्या वेळेत अशा गोष्टी केल्या ज्यामुळे तो यहोवाच्या आणखी जवळ जाऊ शकला. इतकंच नव्हे तर तो अशी कला शिकला ज्यामुळे त्याला सहज काम मिळू शकलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने यहोवाच्या पवित्र आत्म्याकडून मिळणारं मार्गदर्शन स्वीकारलं. खरंच! आपण यातून खूप चांगले धडे शिकू शकतो.—उपदेशक १२:१.

“कोणाही माणसाचे मन कचरू नये”

शौलाची सेवा करताना, अनेकदा दावीद मेढरांचा सांभाळ करण्यासाठी बऱ्याच दिवसांसाठी घरी जात असे. अशाच एका वेळी इशायाने दाविदाला, शौलाच्या सैन्यात असलेल्या त्याच्या तीन भावांची चौकशी करण्यासाठी पाठवलं. दाविदाने आपल्या वडिलांच्या आज्ञेप्रमाणे, आपल्या भावांसाठी खाण्याचं सामान बांधलं आणि एल्याच्या खोऱ्यात जायला निघाला. लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तिथं पोहचल्यावर, त्याने इस्राएली आणि पलिष्टी सैन्याला एकमेकांसमोर पाहिलं. त्या मोठ्या खोऱ्याच्या उतारांवर ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला होते.—१ शमुवेल १७:१-३, १५-१९

दाविदाला ही गोष्ट सहन होत नव्हती की, जिवंत देवाचं, यहोवाचं सैन्य कसं एका तुच्छ माणसाच्या, तेही खोट्या देवतांच्या उपासकाच्या भीतीने पळून जाऊ शकतं? दाविदाच्या दृष्टीने, गल्याथाने इस्राएली लोकांना चिडवणं हा खुद्द यहोवाचा अपमान होता. म्हणून तो सैनिकांशी आवेशाने गल्याथाला हरवण्याबद्दल बोलू लागला. तेवढ्यात दाविदाच्या मोठ्या भावाने, अलीयाबाने दाविदाचं बोलणं ऐकलं. तो आपल्या लहान भावाला ओरडला. आणि तो तिथं फक्त युद्ध पाहण्यासाठी आला आहे असा त्याच्यावर आरोपही लावला. पण दावीद त्याला म्हणाला: “मी असे काय केले? . . . मी केवळ एक प्रश्न विचारत होतो.” त्यानंतर तो गल्याथाला हरवण्याबद्दल आत्मविश्वासाने बोलत राहिला. कुणीतरी त्याचं बोलणं ऐकलं आणि शौलाला सांगितलं. तेव्हा राजाने दाविदाला त्याच्यासमोर हजर करण्याची आज्ञा दिली.—१ शमुवेल १७:२३-३१, सुबोधभाषांतर

दाविदाने राजाला धीर देत म्हटलं की, गल्याथामुळे “कोणाही माणसाचे मन कचरू नये.” शौल आणि त्याच्या लोकांचं हृदय गल्याथामुळे खरोखरी खचलं होतं. ते स्वतःची तुलना गल्याथासोबत करून चूक करत होते. कदाचित ते असा विचार करत होते की, ते त्याच्या कमरेच्या किंवा छातीच्या उंची इतकेही नव्हते. तो अवाढव्य शस्त्र घेतलेला माणूस त्यांना सहज हरवेल असं त्यांना वाटत होतं. पण दावीद असा विचार करत नव्हता. त्याचा या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. म्हणूनच तो स्वतः गल्याथाशी लढायला तयार झाला.—१ शमुवेल १७:३२.

पण शौल म्हणाला: “तुझ्या सारख्या कोवळ्या मुलाला त्या आडदांड मनुष्याला कसे तोंड देता येईल? तू तर लहान मुलगा आहेस आणि तो तर बाळपणापासूनच योद्धा आहे.” दावीद खरोखर लहान मुलगा होता का? नाही. तो लहान मुलासारखा दिसत असावा आणि त्याचं सैन्यात जायचं वय नसावं. पण असं असलं तरी, लोक त्याला एक शूर व्यक्ती म्हणून ओळखत होते आणि त्या वेळी तो कदाचित अठरा-एकोणीस वर्षांचा असावा.—१ शमुवेल १६:१८; १७:३३, सुबोधभाषांतर

दावीद गल्याथाशी लढू शकतो असा शौलाला भरवसा व्हावा, यासाठी दाविदाने तो सिंहासोबत आणि अस्वलासोबत कसा लढला हे शौलाला सांगितलं. दावीद स्वतःबद्दल बढाई मारत होता का? नाही, कारण दाविदाला दोन्ही वेळा तो कसा जिंकला हे माहीत होतं. तो म्हणाला: “ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला या पलिष्ट्यांच्या हातातून सोडवेल.” शेवटी नाइलाजाने शौल त्याला म्हणाला: “जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”—१ शमुवेल १७:३७.

तुमच्याकडेही दाविदासारखा विश्वास असावा असं तुम्हाला वाटतं का? दाविदाचा विश्वास, ही फक्त त्याच्या मनातली कल्पना नव्हती. तर ज्ञानामुळे आणि अनुभवामुळे त्याचा देवावर विश्वास होता. यहोवा प्रेमळ संरक्षक आणि दिलेली वचनं पाळणारा देव आहे हे त्याने अनुभवलं होतं. आपल्यालाही जर असा विश्वास हवा असेल, तर आपल्याला बायबलमधून देवाबद्दल शिकत राहिलं पाहिजे. आपण जे शिकतो ते जीवनात लागू केल्याने आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यामुळे आपलादेखील विश्वास बळकट होतो.—इब्री लोकांस ११:१.

यहोवा तुम्हास आमच्या हाती देईल

शौलाने आधी स्वतःचं चिलखत दाविदाला घालायला दिलं. ते चिलखत गल्याथाच्या चिलखतासारखं होतं आणि तांब्याच्या धातूने बनवलेलं होतं. त्यात एक कोटदेखील होता आणि त्याची रचना एकावर एक असलेल्या खवलांसारखी होती. पण जेव्हा दाविदाने ते जड चिलखत घालून चालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला कळलं की ते घालून त्याला लढता येणार नाही. त्याला सैनिकाचं प्रशिक्षण मिळालं नसल्यामुळे त्याला चिलखत घालायची सवय नव्हती. आणि शौल इस्राएल राष्ट्रातला सर्वात उंच माणूस होता त्याचं चिलखत खूपचं मोठं होतं. (१ शमुवेल ९:२) त्यामुळे दाविदाने ते चिलखत काढलं आणि त्याचे नेहमीचे म्हणजे मेंढपाळाचे कपडे घातले.—१ शमुवेल १७:३८-४०.

दाविदाने आपली मेंढरं राखण्याची काठी, खांद्यावर एक थैली आणि एक गोफण घेतली. गोफण साधीसुधी वाटत असली तरी ते एक फार प्रभावी शस्त्र होतं. गोफणीला दोन चामड्याच्या पट्ट्‌या आणि त्यांच्या शेवटी दगड ठेवण्यासाठी एक छोटीशी पिशवी असते. हे मेंढपाळांसाठी एक उपयोगी शस्त्र असायचं. मेंढपाळ त्या छोट्याशा पिशवीत दगड ठेवून, गोफण आपल्या डोक्यावर जोरजोरात फिरवायचा, आणि मग त्यातली एक चामड्याची पट्टी सोडून तो दगड आपल्या लक्ष्याच्या दिशेने अचूक सोडायचा. हे शस्त्र इतकं प्रभावी होतं की काही सैन्यांमध्ये गोफण चालवणाऱ्यांच्या तुकड्यादेखील असायच्या.

अशा प्रकारे दावीद आपल्या शत्रूचा सामना करायला सज्ज झाला. त्याने सुकलेल्या नदीतून पाच गुळगुळीत दगड उचलले. दाविदाने त्या वेळी किती कळकळून प्रार्थना केली असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्यानंतर तो पळत रणांगणावर गेला.

गल्याथाने आपल्या प्रतिस्पर्ध्याला पाहिल्यावर काय विचार केला? त्याने “दाविदास न्याहळून पाहिले तेव्हा तो त्यास तुच्छ वाटला, कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता.” गल्याथ ओरडला: “मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन मजपुढे आला आहेस?” त्याने फक्त दाविदाच्या हातातली काठी पाहिली पण गोफणीकडे लक्षही दिलं नाही. त्याने पलिष्टी देवतांची नावं घेऊन दाविदाला शिव्याशाप दिले आणि या तुच्छ शत्रूचे शरीर पक्ष्यांना आणि प्राण्यांना खायला देईन अशी शपथ घेतली.—१ शमुवेल १७:४१-४४.

दाविदाने त्याला दिलेलं उत्तर आजही विश्वासाचं प्रतीक आहे. कल्पना करा हा तरुण मुलगा गल्याथाला हाक मारून म्हणतो: “तू तलवार, भाला व बरची घेऊन मजवर चढून आला आहेस; पण इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस; त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुजकडे आलो आहे.” दाविदाला माहीत होतं की माणसाची शक्ती आणि शसत्रं काही कामाची नाहीत. गल्याथाने यहोवाला अनादर दाखवला होता आणि यहोवा त्याला उत्तर देणार होता. म्हणूनच दावीद म्हणाला: “हे युद्ध परमेश्वराचे आहे.”—१ शमुवेल १७:४५-४७.

दाविदाला गल्याथ किती अवाढव्य आहे आणि त्याच्याकडे किती शसत्रं आहेत हे माहीत होतं. पण या गोष्टींना दावीद घाबरला नाही. जी चूक शौल आणि त्याच्या सैन्याने केली ती त्याने केली नाही. त्याने स्वतःची तुलना गल्याथासोबत केली नाही तर, यहोवाच्या तुलनेत गल्याथ कसा आहे हे पाहिलं. साडे नऊ फूटाच्या गल्याथाच्या तुलनेत बाकी माणसं फार छोटी दिसत असली तरी, यहोवासमोर गल्याथ केवढा होता? इतर कोणत्याही माणसाप्रमाणेच फक्त एका किटकासारखा. असा किटक ज्याचा यहोवा लवकरच नाश करणार होता!

दावीद आपल्या शत्रूच्या दिशेने धावला आणि आपल्या थैलीतून त्याने एक दगड काढला आणि तो गोफणीत घातला. तो गोफण आपल्या डोक्यावर जोरजोरात फिरवू लागला. गल्याथदेखील त्याच्या शस्त्रवाहकच्या पाठी दाविदाच्या दिशेने येऊ लागला. गल्याथाची उंचीच त्याच्यासाठी घातक ठरली, कारण एक साधारण उंचीचा शस्त्रवाहक गल्याथाचं डोकं सुरक्षित राहील, इतकी उंच ढाल धरू शकत नव्हता. आणि दाविदाने त्याच्या डोक्यावरच नेम धरला.—१ शमुवेल १७:४१.

यहोवाच्या तुलनेत दाविदाला अवाढव्य गल्याथ लहान किटकासारखा वाटला

दाविदाने गोफणीतून दगड सोडला. तो दगड जसा आपल्या लक्ष्याकडे जाऊ लागला तेव्हा सगळे कसे शांत झाले असतील याची कल्पना करा. यहोवाने दाविदाची मदत केल्यामुळे त्याला दुसरा दगड गोफणीत घालावाच लागला नाही, कारण पहिलाच दगड बरोबर गल्याथाच्या कपाळाच्या मध्यभागी जाऊन लागला. आणि तो आपल्या तोंडावर खाली पडला! त्याचा शस्त्रवाहक घाबरून पळून गेला. दाविदाने धावत जाऊन गल्याथाची तलवार उचलली आणि त्याचं डोकं धडापासून वेगळे केलं.—१ शमुवेल १७:४८-५१.

आता शौल आणि त्याच्या सैनिकांना धीर आला. मोठ्याने युद्धाची ललकारी देऊन ते पलिष्ट्यांवर चालून गेले. या युद्धाचा निकाल तसाच लागला जसं दाविदाने गल्याथाला म्हटलं होतं: “तो तुम्हास [सर्वांना, NW] आमच्या हाती देईल.”—१ शमुवेल १७:४७, ५२, ५३.

आज देवाचे सेवक जीवघेण्या युद्धांमध्ये भाग घेत नाहीत. युद्ध करण्याचा काळ निघून गेला आहे. (मत्तय २६:५२) तरीदेखील आपल्याला दाविदाच्या विश्वासाचं अनुकरण करण्याची गरज आहे. दाविदासारखाच आपल्यासाठी देखील यहोवा खराखुरा असला पाहिजे. आपण त्याचीच सेवा केली पाहिजे आणि त्याचंच आदरयुक्त भय मानलं पाहिजे. कधीकधी आपल्या समस्या आपल्याला खूप मोठ्या वाटतील पण यहोवाच्या अफाट शक्तीपुढे त्या फार छोट्या आहेत. जर आपण यहोवाला आपला देव म्हणून निवडलं आणि त्याच्यावर दाविदासारखा विश्वास दाखवला तर कुठलीही समस्या, कुठलाही प्रश्न आपल्याला सतावणार नाही. कारण यहोवा कशावरही मात करू शकतो! (wp16-E No. 5)