व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्‍वाच्या अभ्यासातून काय समजतं

विश्‍वाच्या अभ्यासातून काय समजतं

विश्‍वाचा अफाट पसारा पाहून खगोलशास्त्रज्ञ नेहमीच आश्‍चर्यचकित होतात. म्हणून त्याचा आणखी चांगला अभ्यास करण्यासाठी ते आजपर्यंत नवनवीन उपकरणं बनवत आले आहेत. मग त्यांना आपल्या अभ्यासातून काय दिसून आलं?

विश्‍वाची मांडणी सुव्यवस्थित आहे. ॲस्ट्रॉनॉमी  या मासिकात असं म्हटलं आहे: “अफाट अंतराळात असंख्य आकाशगंगा अशाच इकडे-तिकडे पसरलेल्या नाहीत, तर त्या एका जाळीसारख्या रचनात्मक पद्धतीने पसरलेल्या आहेत.” हे कसं काय शक्य आहे? शास्त्रज्ञांच्या मते याचं रहस्य डार्क मॅटर (कृष्णद्रव्य) नावाच्या एका अदृश्‍य आणि अज्ञात पदार्थात लपलेलं आहे.” असं म्हटलं जातं, की हा पदार्थ “एका अदृश्‍य सांगाड्यासारखा आहे, जो आकाशगंगाच्या असंख्य समूहांना एकमेकांशी बांधून ठेवतो.”

विश्‍वात ही सुव्यवस्था कुठून आली? ती आपोआप येणं शक्य आहे का? “विसाव्या शतकातले अत्यंत प्रभावी आणि महान खगोलशास्त्रज्ञ,” अशी ओळख असणारे ॲलन सॅन्डेज याबदद्‌ल काय म्हणतात त्याकडे लक्ष द्या. सॅन्डेज यांचा देवावर विश्‍वास आहे.

ते म्हणतात: “एका अनियंत्रित आणि योगायोगाने घडलेल्या प्रक्रियेतून इतकी सुव्यवस्थित रचना अस्तित्वात येणं अगदीच अशक्य गोष्टए असं मला वाटतं.”

जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी हे विश्‍व अगदी योग्य आहे. भौतिकशास्त्रात विश्‍वातल्या चार मूलभूत बलांबद्दल सांगितलं आहे. त्यांपैकी एक म्हणजे क्षीण आण्विक बल (वीक न्युक्लियर फोर्स). या बलामुळे सूर्य वर्षानुवर्ष एकसारखा जळत राहतो. हे क्षीण बल आहे त्यापेक्षा थोडं जरी कमकुवत असतं, तर सूर्य मुळात तयारच झाला नसता. दुसरीकडे पाहता, हे बल आहे त्यापेक्षा किंचित जरी प्रबळ असतं, तर सूर्य केव्हाच जळून त्याचं अस्तित्व मिटून गेलं असतं.

क्षीण बल हे फक्‍त एक उदाहरण झालं. यासारख्या आणखी कित्येक गोष्टी आहेत ज्या अगदी अचूक प्रमाणात असल्यामुळे किंवा सुसंगत असल्यामुळे जीवसृष्टीचं अस्तित्व टिकून आहे. विज्ञानाचे एक लेखक अनील अनंथस्वामी असं म्हणतात: “यांपैकी एका जरी गोष्टीचं प्रमाण आहे त्यापेक्षा कमी किंवा जास्त असतं, तर “ग्रह, तारे आणि आकाशगंगा अस्तित्वात आल्याच नसत्या आणि जीवनाचं तर नावच नसतं.”

मानवांना राहण्यासाठी विश्‍वात एक योग्य ठिकाण आहे. ते ठिकाण म्हणजे पृथ्वी. मानवांना जगण्यासाठी पृथ्वीवरचं वातावरण आणि पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे. तसंच, पृथ्वी आपल्या जागी एका विशिष्ट कोनात कललेली राहावी म्हणून चंद्राचा आकारसुद्धा अगदी योग्य आहे. नॅशनल जिओग्राफिक  या मासिकात असं म्हटलं आहे: “पृथ्वीची भूरचना, वातावरण आणि त्यातली जीवसृष्टी यांच्यातला ताळमेळच पृथ्वीला असा एकमेव ग्रह बनवतो जिथे मानव राहू शकतात.” *

एक लेखकाने म्हटल्याप्रमाणे, आपली सूर्यमाला आपल्या आकाशगंगेत “अशा ठिकाणी आहे जिथे इतर ग्रह-ताऱ्‍यांची गर्दी नाही.” पण त्यामुळेच पृथ्वीवरचं जीवन टिकून आहे. आपण जर इतर ताऱ्‍यांच्या जवळपास असतो, मग ते आकाशगंगेच्या मध्यभागी असो किंवा कडेला असो, घातक किरणांच्या माऱ्‍यामुळे (रेडिएशनमुळे) जीवनाला कायमचा पूर्णविराम मिळाला असता. पण आपण अशा ठिकाणी आहोत ज्याला शास्त्रज्ञ, “गॅलेक्टिक हॅबीटेबल झोन” म्हणतात. म्हणजे आपल्या आकाशगंगेतलं असं ठिकाण जे जीवनासाठी सगळ्यात अनुकूल आहे.

भौतिकशास्त्रज्ञ पॉल डेविस यांनी विश्‍वाबद्दल आणि ते कसं काम करतं याबद्दल त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर असा निष्कर्ष काढला: “विश्‍वाच्या या भव्य रंगभूमीवर आपण फक्‍त योगायोगाने, अपघाताने किंवा चुकून आलो असं म्हणणं मला बिलकूल पटत नाही. . . . उलट आपण इथं असण्यामागे खरंच काहीतरी कारण आहे असं मला वाटतं.” डेविस यांना विश्‍वाची आणि मानवांची निर्मिती देवाने केली आहे असं म्हणायचं नव्हतं. पण तुम्हाला काय वाटतं? विश्‍वाच्या आणि पृथ्वीच्या रचनेकडे पाहिलं तर असं दिसतं, की जीवन टिकून राहण्यासाठी ती अगदी योग्य आहे. मग, त्यासाठीच त्यांची रचना करण्यात आली असेल का?

^ परि. 8 नॅशनल जिओग्राफिक  या मासिकातल्या लेखात, पृथ्वी आणि मानव यांना देवाने बनवलं आहे असं सांगण्यात आलेलं नाही; तर पृथ्वी मानवांना राहण्यासाठी किती योग्य आहे याबद्दल सांगितलं आहे.