व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूच्या जन्माच्या अहवालातून धडे

येशूच्या जन्माच्या अहवालातून धडे

येशूच्या जन्माच्या अहवालातून धडे

येशूच्या जन्माच्या संदर्भातील घटनांविषयी कोट्यवधी लोकांना उत्सुकता आहे. नाताळाच्या वेळी जगभरात येशूच्या जन्मावर आधारित जी दृश्‍ये आणि नाटके सादर केली जातात त्यावरून हे दिसून येते. पण येशूच्या जन्माच्या संदर्भातील घटना रोचक असल्या तरी त्या बायबलमध्ये लोकांच्या मनोरंजनाकरता नोंदवलेल्या नाहीत. तर, देवाने सद्‌बोध व सुधारणुकीसाठी प्रेरित केलेल्या शास्त्रलेखाचा त्या भाग आहेत.—२ तीमथ्य ३:१६.

ख्रिश्‍चनांनी येशूची जन्मतिथी साजरी करावी अशी देवाची इच्छा असती तर बायबलमध्ये अचूक तारीख देण्यात आली असती. ती आहे का? येशूचा जन्म झाला तेव्हा मेंढपाळ रात्रीच्या वेळी बाहेर आपल्या कळपांची राखण करीत होते हे सांगितल्यावर, अल्बर्ट बार्न्स हे १९ व्या शतकातील बायबल विद्वान म्हणतात: “यावरून स्पष्ट होते की, आपला तारणारा २५ डिसेंबरच्या आधी जन्मला होता . . . त्या वेळी कडाक्याची थंडी असते आणि विशेषकरून बेथलेहेमच्या आसपासच्या उंच, डोंगराळ भागांमध्ये जास्त थंडी असते. देवाने [येशूच्या] जन्मण्याचा समय गुपित ठेवला आहे. . . . तो समय जाणण्याची काही गरज नव्हती; असती तर देवाने त्याचा अहवाल जपून ठेवला असता.”

याच्या उलट, येशू केव्हा मरण पावला त्या दिवसाची माहिती चारही शुभवर्तमानाचे लेखक आपल्याला देतात. हे वल्हांडणाच्या दिवशी घडले; निसान या यहुदी महिन्याच्या १४ व्या दिवशी वसंत ऋतूत हे घडले. शिवाय, येशूने आपल्या अनुयायांना त्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळण्याची खास आज्ञा दिली. (लूक २२:१९) बायबलमध्ये येशूचा वाढदिवस साजरा करण्याची किंवा इतर कोणत्याही व्यक्‍तीचा वाढदिवस साजरा करण्याची आज्ञा दिलेली नाही. दुःखाची गोष्ट म्हणजे, येशूच्या जन्माच्या तारखेवरील वादविवादामुळे त्या वेळी घडलेल्या अधिक महत्त्वाच्या इतर घटनांकडे दुर्लक्ष केले जाते.

देवाने निवडलेले पालक

इस्राएलमधील हजारो कुटुंबांमधून देवाने आपल्या पुत्राचे संगोपन करण्यासाठी कोणत्या पालकांची निवड केली? प्रसिद्धी आणि धनसंपत्ती या गोष्टींना त्याने महत्त्वाचे लेखले का? नाही. उलट, यहोवाने त्या पालकांच्या आध्यात्मिक गुणांची दखल घेतली. लूक १:४६-५५ येथे नोंदल्याप्रमाणे, मरीयेच्या स्तुती गीताचे परीक्षण करा; ती मशीहाची आई होणार या सुहक्काविषयी तिला सांगितल्यावर तिने हे गीत गायिले होते. इतर गोष्टींसोबत ती म्हणाली: “माझा जीव प्रभूला थोर मानितो . . . कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे.” ती नम्रपणे स्वतःला ‘दैन्यावस्थेत’ अर्थात यहोवाची दासी असल्याचे समजते. याहून महत्त्वाचे म्हणजे, मरीयेच्या गीतातील स्तुतीच्या सुंदर अभिव्यक्‍तींवरून प्रकट होते की, ती आध्यात्मिक वृत्तीची व्यक्‍ती असून शास्त्रवचनांचे तिला बऱ्‍यापैकी ज्ञान होते. आदामाची पापी संतती असूनही देवाच्या पुत्राची पार्थिव माता या नात्याने तीच योग्य निवड होती.

मरीयेच्या पतीविषयी काय, जो येशूचा पालन पोषण करणारा पिता बनला? योसेफाला सुतारकामाचे व्यवहारज्ञान होते. कष्ट करण्याची तयारी असल्यामुळे कालांतराने पाच मुले आणि कमीत कमी दोन मुली झालेल्या कुटुंबाचे भरणपोषण तो करू शकला. (मत्तय १३:५५, ५६) योसेफ श्रीमंत नव्हता. मरीयेला देवाच्या मंदिरात आपल्या पहिल्या पुत्राला सादर करण्याची वेळ आली तेव्हा आपण बलिदानासाठी मेंढरू देऊ शकत नाही यामुळे योसेफ निराश झाला असावा. त्याउलट, त्यांना गरीबांसाठी केलेल्या तरतूदीचा उपयोग करावा लागला. नवजात बालकाच्या आईविषयी देवाच्या नियमशास्त्रात म्हटले होते: “तिला मेंढा अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी आणावी, आणि याजकाने तिच्यासाठी प्रायश्‍चित करावे म्हणजे ती शुध्द होईल.”—लेवीय १२:८; लूक २:२२-२४.

बायबल म्हणते की, योसेफ “नीतिमान होता.” (मत्तय १:१९) उदाहरणार्थ, आपल्या कुमारिका पत्नीने येशूला जन्म देईपर्यंत त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवला नाही. यामुळे येशूचा खरा पिता कोण होता याविषयी कसलीही शंका निर्माण झाली नाही. नव-विवाहित जोडप्याला एकाच घरात राहून जवळीक टाळणे इतके सोपे राहिले नसावे, पण यावरून दिसून येते की, देवाच्या पुत्राचे संगोपन करण्यासाठी त्यांना निवडले हा एक मोठा बहुमान होता असे ते दोघेही समजत होते.—मत्तय १:२४, २५.

मरीयेप्रमाणे योसेफ देखील आध्यात्मिक वृत्तीचा होता. तो दरवर्षी काम थांबवून तीन दिवसांचा प्रवास करून आपल्या कुटुंबाला वल्हांडणाच्या वार्षिक सणाकरता नासरेथहून जेरूसलेमला आणीत असे. (लूक २:४१) तसेच, योसेफाने लहानग्या येशूला, देवाचे वचन वाचून स्पष्ट केले जात होते त्या स्थानीय सभास्थानातल्या उपासनेत दर आठवडी भाग घेण्याची सवय लावली असेल. (लूक २:५१; ४:१६) त्यामुळे, देवाने आपल्या पुत्राकरता योग्य पार्थिव आई आणि पालन पोषण करणारा पिता निवडला यात काहीच शंका नाही.

गरीब मेंढपाळांवर मोठा आशीर्वाद

आपल्या पत्नीला नववा महिना चालू असल्यामुळे तिला त्रास होत असतानाही योसेफ कैसराच्या नियमानुसार आपल्या पूर्वजांच्या शहरात नोंदणी करण्यासाठी जातो. हे जोडपे बेथलेहेमात येते तेव्हा त्यांना लोकांची गर्दी जमलेल्या शहरात राहायला ठिकाण मिळत नाही. अशाप्रकारे, परिस्थितीमुळे त्यांना तबेल्यात राहणे भाग पडले जेथे येशूचा जन्म झाला आणि त्याला गव्हाणीत ठेवण्यात आले. या गरीब पालकांचा विश्‍वास बळकट करण्यासाठी यहोवाने त्यांना हा जन्म देवाच्या इच्छेनुसार होत असल्याची पुष्टी दिली. त्याने बेथलेहेमहून काही वडिलजनांना या जोडप्याला हमी देण्यासाठी पाठवले का? नाही. तर, ही गोष्ट यहोवा देवाने, रात्रीच्या वेळी बाहेर राहून आपल्या कळपांची राखण करत असलेल्या कष्टाळू मेंढपाळांना प्रकट केली.

देवाचा दूत त्यांना प्रकट झाला आणि तुम्ही बेथलेहेमला जा व तेथे नवजात मशीहा तुम्हाला ‘गव्हाणीत ठेवलेला आढळेल’ असे त्याने त्यांना सांगितले. या गरीब लोकांना नवजात मशीहा तबेल्यात होता हे ऐकून धक्का बसला किंवा ते गोंधळून गेले का? मुळीच नाही! विलंब न लावता, आपले कळप सोडून ते त्वरित बेथलेहेमला रवाना झाले. त्यांना येशू आढळल्यावर, त्यांनी योसेफ व मरीयेला देवाच्या दूताने काय म्हटले ते सांगितले. यामुळे, सर्वकाही देवाने उद्देशिल्याप्रमाणे घडत आहे याविषयी त्या जोडप्याची खात्री अधिकच पटली असावी. “नंतर ते मेंढपाळ . . . देवाचे गौरव व स्तुति करीत परत गेले.” (लूक २:८-२०) होय, देव-भीरू मेंढपाळांना प्रकट करण्याची यहोवाने योग्य निवड केली होती.

वरील गोष्टींवरून, यहोवाची मर्जी संपादण्यासाठी कशाप्रकारचे लोक असण्याची गरज आहे हे आपल्याला शिकायला मिळते. आपण प्रसिद्धी किंवा धनसंपत्ती मिळवण्याची आस धरू नये. तर, योसेफ, मरीया आणि मेंढपाळांप्रमाणे आपण देवाला आज्ञाधारक असावे आणि भौतिक गोष्टींऐवजी आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देऊन त्याच्याप्रती आपले प्रेम दाखवावे. अशाप्रकारे, येशूच्या जन्माच्या वेळी घडलेल्या घटनांच्या अहवालावर मनन करून अनेक उत्तम धडे शिकता येतात.

[७ पानांवरील चित्र]

मरीयेने दोन कबुतरे दिली त्यावरून काय दिसून येते?

[७ पानांवरील चित्र]

देवाने येशूचा जन्म झाल्याची बातमी प्रथम काही गरीब मेंढपाळांना प्रकट केली