व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गणनाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

गणनाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

गणनाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

इजिप्तमधून बाहेर आल्यानंतर इस्राएलांना एका राष्ट्रात संघटित करण्यात आले. त्यानंतर लगेच ते वचनयुक्‍त देशात प्रवेश करू शकले असते, परंतु तसे झाले नाही. त्याऐवजी ते जवळजवळ चार दशके ‘घोर व भयानक रानात’ भटकत राहिले. (अनुवाद ८:१५) का? बायबलमधील गणना नावाच्या पुस्तकातील ऐतिहासिक अहवाल आपल्याला काय काय घडले ते सांगतो. यावरून, आपण यहोवा देवाची आज्ञा मानली पाहिजे आणि त्याच्या प्रतिनिधींचा आदर केला पाहिजे हे आपल्या मनावर ठसले पाहिजे.

रानात आणि मवाबाच्या पठारावर असताना मोशेने गणनाचे पुस्तक लिहिले; या पुस्तकात, ३८ वर्षे आणि ९ महिन्यांच्या अर्थात सा.यु.पू. १५१२ पासून सा.यु.पू. १४७३ पर्यंतच्या कालावधीचा वृत्तान्त दिला आहे. (गणना १:१; अनुवाद १:३) सुमारे ३८ वर्षांच्या कालावधीत घेतलेल्या इस्राएलांच्या दोन शिरगणनेच्या आधारावर या पुस्तकाचे नाव गणना पडले. (अध्याय १-४, २६) या पुस्तकाची तीन भागांत विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या भागात, सीनाय पर्वतावर झालेल्या घटनांचा वृत्तान्त आहे. दुसऱ्‍या भागात, इस्राएल रानात भटकत असताना काय काय घडले ते सांगितले आहे. आणि शेवटल्या भागात मवाबाच्या पठारावरील घटनांचे वर्णन आहे. हा अहवाल वाचत असताना तुम्हाला स्वतःला असे प्रश्‍न विचारावेसे वाटतील; जसे की: ‘या घटनांवरून मी काय शिकू शकतो? आज मला लाभदायक ठरतील अशी तत्त्वे या पुस्तकात आहेत का?’

सीनाय पर्वतावर

(गणना १:१–१०:१०)

पहिल्या दोन शिरगणना, इस्राएली लोक अद्याप सीनाय पर्वताच्या पायथ्याशी असतानाच होतात. लेवीयांना सोडून, २० आणि त्याहून जास्त वय असलेल्या पुरुषांची एकूण संख्या ६,०३,५५० इतकी होते. ही गणना, लष्करी हेतूसाठी घेण्यात आली होती, हे स्पष्ट आहे. स्त्रिया, मुले, लेवी या सर्वांची संख्या ३० लाखांहून अधिक असावी.

गणनेनंतर इस्राएलांना, पद्धतशीररीत्या आगेकूच करण्याच्या संबंधाने, लेवीयांच्या व निवासमंडपातील कामासंबंधाने, रोग्याला वेगळे ठेवण्याच्या आज्ञेसंबंधाने, हेव्यादाव्यांबाबत असलेल्या नियमांच्या संबंधाने आणि नाजीरांनी केलेल्या शपथांच्या संबंधाने सूचना देण्यात आल्या. सातव्या अध्यायात, वेदीच्या उद्‌घाटनानिमित्त वंशाच्या प्रमुखांनी केलेल्या बलिदानांविषयी माहिती आहे आणि नवव्या अध्यायात वल्हांडण सणाबद्दलची माहिती आहे. तळ देण्याविषयी आणि कूच करण्याविषयी देखील इस्राएली लोकांना सूचना देण्यात आल्या.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:१, २—ज्यांच्या भोवती तीन वंशाच्या विभागांना डेरा द्यायचा होता त्या कोणत्या ‘निशाणीं’ होत्या? या निशाणींविषयी बायबलमध्ये वर्णन देण्यात आलेले नाही. परंतु, त्यांना पवित्र चिन्हे समजले जात नव्हते किंवा धार्मिक महत्त्वही दिले जात नव्हते. या निशाणीं एका व्यावहारिक उद्देशास्तव अर्थात एखाद्या व्यक्‍तीला छावणीतील आपले योग्य ठिकाण शोधण्यास मदत व्हावी म्हणून वापरल्या जात होत्या.

५:२७—जारकर्माचा दोष असलेल्या पत्नीची “मांडी सडेल” याचा काय अर्थ होतो? येथे “मांडी” हा शब्द जननेंद्रियांना सूचित करण्यासाठी वापरण्यात आला आहे. (प्रारंभ ४६:२६, पं.र.भा.) ‘सडणे’ यावरून या इंद्रियांचा ऱ्‍हास होणे सूचित होते ज्यामुळे गर्भधारणा अशक्य होते.

आपल्याकरता धडे:

६:१-७. नाजीरांना द्राक्षारसापासून बनवलेले पदार्थ आणि नशा आणणारी सर्व पेये वर्ज्य करायची होती; यासाठी त्यांना आत्म-त्याग करावयाचा होता. स्त्रियांना जसे त्यांच्या पतीच्या किंवा पित्याच्या आज्ञेत राहायचे होते तसे नाजीरांनाही आपण यहोवाच्या अधीन आहोत हे दाखवण्यासाठी आपले केस वाढू द्यायचे होते. त्यांना कोणत्याही मृत शरीरापासून, मग ते त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचे असले तरी त्यापासून दूर राहून शुद्ध राहायचे होते. आज पूर्ण वेळेच्या सेवकांना आत्म-त्याग दाखवावा लागतो आणि यहोवा व त्याच्या व्यवस्थेला अधीनता दाखवावी लागते तेव्हा ते अशीच आत्म-बलिदानाची मनोवृत्ती दाखवतात. काही नेमणूकांमध्ये त्यांना एखाद्या दूर देशांत जावे लागते; यामुळे त्यांच्या जवळच्या कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला तर त्यांच्या अंत्यविधीसाठी येणे देखील कठीण असते किंवा अशक्य असते.

८:२५, २६. लेवीयांच्या सेवेसाठी पात्र पुरुषांना नेमले जाते याची खात्री करण्यासाठी व वृद्ध पुरुषांच्या वयाचा विचार करून त्यांना बंधनकारक कामातून निवृत्त होण्याची आज्ञा देण्यात आली होती. परंतु ते स्वेच्छेने इतर लेवीयांना मदत करू शकत होते. आज राज्य उद्‌घोषक होण्यापासून कोणी निवृत्त होऊ शकत नसला तरी, या नियमामागचे तत्त्व आपल्याला एक मौल्यवान धडा शिकवते. वाढत्या वयामुळे एखादा ख्रिस्ती बांधव अथवा भगिनी विशिष्ट जबाबदाऱ्‍या पूर्ण करू शकत नसेल तर तो किंवा ती आपल्या कुवतीप्रमाणे सेवेत भाग घेऊ शकतो/शकते.

रानात एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी

(गणना १०:११–२१:३५)

निवासमंडपावरून मेघ वर गेले की इस्राएली लोक कूच करत; ३८ वर्षे आणि एक किंवा दोन महिन्यांनंतर ते मबावाच्या पठारावर येतात. यहोवाच्या साक्षीदारांनी छापलेले “उत्तम देश पाहा” (इंग्रजी), या माहितीपत्रकाच्या पृष्ठ ९ वरील नकाशावर इस्राएली लोकांनी कोठून प्रवास केला ते पाहिल्यास तुम्हाला खूप मदत होईल.

कादेशला जाताना, पारानच्या रानात तक्रारीच्या निदान तीन तरी घटना घडल्या. काही लोकांना भस्म करण्यासाठी यहोवा जेव्हा अग्नी पाठवतो तेव्हा पहिली तक्रार समाप्त होते. मग, इस्राएली मांसाहारासाठी कुरकूर करू लागतात आणि यहोवा त्यांच्यासाठी लावे पाठवतो. मिर्याम आणि अहरोन मोशेविरुद्ध तक्रार करतात त्यामुळे मिर्यामला तात्पुरत्या काळासाठी कोड होते.

कादेशमध्ये तळ ठोकलेला असताना मोशे वचनयुक्‍त देश हेरण्यासाठी १२ हेरांना पाठवतो. ४० दिवसांनंतर ते घरी परत येतात. दहा हेरांनी दिलेल्या वाईट बातमीवर विश्‍वास ठेवल्यामुळे इस्राएल लोक मोशे, अहरोन आणि यहोशवा व कालेब या विश्‍वासू हेरांना दगडमार करू इच्छितात. या इस्राएली लोकांचा मी मरीने संहार करेन असे जेव्हा यहोवा म्हणतो तेव्हा मोशे त्यांना माफ करावे म्हणून देवाजवळ विनंती करतो व देव असे घोषित करतो, की ज्यांची गणना झाली ते लोक मरेपर्यंत रानात ४० वर्षे भटकत राहतील.

यहोवा आणखी नियम देतो. कोरह आणि इतर लोक मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध बंड करतात पण काही बंडखोरांचा अग्नीने नाश होतो तर काही पृथ्वी दुभंगून जिवंत गाडले जातात. दुसऱ्‍या दिवशी इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकूर करू लागते. यामुळे यहोवाने आणलेल्या मरीने १४,७०० लोक मृत्यूमुखी पडतात. महायाजक म्हणून आपण कोणाला निवडले हे दाखवण्यासाठी यहोवा अहरोनाच्या काठीला अंकूर फुटू देतो. यानंतर मग लेवीयांच्या जबाबदाऱ्‍यांविषयी आणि लोकांच्या शुद्धीकरणाविषयी यहोवा आणखी नियम देतो. पोवळ्या रंगाच्या कालवडीची राख, येशूच्या बलिदानाद्वारे होणाऱ्‍या शुद्धीकरणाला सूचित करते.—इब्री लोकांस ९:१३, १४.

इस्राएल पुत्र कादेशला पुन्हा जातात, तेथे मिर्यामचा मृत्यू होतो. पुन्हा इस्राएल लोकांची मंडळी मोशे व अहरोनाविरुद्ध कुरकूर करते. कशाला? त्यांना प्यायला पाणी नसते म्हणून. पण त्यांना चमत्कारिकरीत्या पाणी पुरवले जाते तेव्हा मोशे व अहरोन यहोवाच्या नावाला पवित्र करत नाहीत; यामुळे ते वचनयुक्‍त देशात प्रवेश करण्याची संधी गमावून बसतात. इस्राएल कादेशहून कूच करतो आणि होर पर्वताजवळ अहरोनाचा मृत्यू होतो. अदोम देशाला वळसा घालून जात असताना इस्राएली लोक थकून जातात आणि देवाविरुद्ध व मोशेविरुद्ध बोलू लागतात. तेव्हा त्यांना शिक्षा देण्यासाठी यहोवा त्यांच्यामध्ये विषारी साप पाठवतो. पुन्हा मोशे त्यांच्यावतीने क्षमा मागतो तेव्हा देव त्याला, तांब्याचा एक साप बनवून तो एका खांबावर लाव म्हणजे सर्पदंश झालेला कोणी त्या सापाकडे पाहील तर आपला जीव वाचवेल, असे सांगतो. हा साप आपल्या चिरकालिक फायद्यासाठी येशू ख्रिस्ताला खांबावर खिळण्यात आले याला चित्रित करतो. (योहान ३:१४, १५) इस्राएल लोक, अमोरी राजे सीहोन आणि ओग यांचा पराभव करतात आणि त्यांच्या भूमीवर कब्जा करतात.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१२:१—मिर्याम आणि अहरोनाने मोशेविरुद्ध कुरकूर का केली? कुरकूर करण्यामागचे खरे कारण म्हणजे, मिर्यामला सत्ता हवी होती असे दिसते. मोशेची बायको सिप्पोरा जेव्हा मोशेकडे रानात त्याच्याजवळ राहायला आली तेव्हा कदाचित मिर्यामला वाटले असावे, की तिला छावणीत काही स्थान राहणार नाही.—निर्गम १८:१-५.

१२:९-११—केवळ मिर्यामलाच कोड का लागले? कारण तिनेच कुरकूरीची सुरवात केली असावी आणि आपल्याला साथ द्यावी म्हणून अहरोनाला गळ घातली असावी. पण अहरोनाने आपली चूक कबूल करून योग्य मनोवृत्ती दाखवली.

२१:१४, १५—येथे कोणत्या ग्रंथाविषयी सांगण्यात आले आहे? शास्त्रवचने वेगवेगळ्या पुस्तकांचा संदर्भ देतात ज्यांचा बायबल लेखकांनी मूळ स्रोत म्हणून उपयोग केला होता. (यहोशवा १०:१२, १३; १ राजे ११:४१; १४:१९, २९) “परमेश्‍वराचे संग्राम” हा तो ग्रंथ होता. या ग्रंथात यहोवाच्या लोकांनी लढलेल्या युद्धांचा ऐतिहासिक अहवाल होता.

आपल्याकरता धडे:

११:२७-२९. यहोवाच्या सेवेत इतरांना विशेषाधिकार मिळतात तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे याविषयी मोशेने उत्तम उदाहरण मांडले. एलदाद व मेदाद संदेष्ट्यांप्रमाणे संदेश सांगू लागले तेव्हा स्वतःचे गौरव व्हावे म्हणून हेवा दाखवण्याऐवजी मोशेला उलट आनंदच वाटला.

१२:२, ९, १०; १६:१-३, १२-१४, ३१-३५, ४१, ४६-५०. देवाकडून अधिकार प्राप्त झालेल्यांचा आदर आपल्या उपासकांनी करावा अशी अपेक्षा यहोवा त्यांच्याकडून करतो.

१४:२४. पाप करण्यास प्रवृत्त करणाऱ्‍या जगिक दबावांचा प्रतिकार करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘निराळी वृत्ती’ किंवा मनोवृत्ती विकसित करणे होय. अशी वृत्ती जगाच्या वृत्तीसारखी नसावी.

१५:३७-४१. इस्राएली लोकांच्या वस्रांच्या काठाला लावलेले गोंडे त्यांना याची आठवण करून देण्यासाठी होते, की त्यांना देवाची उपासना करण्यासाठी आणि त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी वेगळे करण्यात आले होते. आपणही देवाच्या दर्जांनुरूप जीवन जगण्याद्वारे जगापासून वेगळे असे उठून दिसू नये का?

मवाबाच्या पठारांवर

(गणना २२:१–३६:१३)

इस्राएली लोक मवाबाच्या पठारांवर डेरा टाकतात तेव्हा मवाबी लोक हवालदिल होतात. यास्तव, मवाबचा राजा बालाक इस्राएलांना शाप देण्यासाठी बलामाला पैसे देतो. पण यहोवा बलामाला त्यांना आशीर्वाद देण्यास भाग पाडतो. तेव्हा इस्राएली पुरुषांना अनैतिकता आणि मूर्तिपूजा यांत फसवण्यासाठी मवाबी आणि मिद्यानी स्त्रियांचा उपयोग केला जातो. यामुळे यहोवा २४,००० अपराध्यांचा नाश करतो. यहोवाचा कोणी प्रतिस्पर्धी आपण सहन करू शकत नाही हे जेव्हा फीनहास दाखवून देतो तेव्हा मरी थांबते.

दुसऱ्‍या शिरगणतीत दिसून आले, की पहिल्या शिरगणतीत मोजलेल्यांपैकी यहोशवा व कालेब यांच्याशिवाय एकही पुरूष जिवंत राहिला नव्हता. यहोशवाला मोशेचा वारस होण्याचा हुकूम दिला जातो. विविध बलिदानांसंबंधीच्या कार्यपद्धती व शपथा वाहण्यासंबंधीच्या सूचना दिल्या जातात. इस्राएल लोक मिद्यानी लोकांचा बदलाही घेतात. रऊबेन, गाद आणि मनश्‍शेच्या वंशातले अर्धे लोक यार्देन नदीच्या पूर्वेस वस्ती करतात. यार्देन पार करण्याविषयी आणि देशावर कब्जा मिळवण्याविषयी इस्राएली लोकांना सूचना दिल्या जातात. देशाच्या सीमांबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिले जाते. चिठ्ठ्या टाकून जमिनीची वाटणी व्हावयाची असते. लेवीयांना ४८ शहरे नेमण्यात येतात आणि यांपैकी ६ शहरे शरणपुरे असावयाची होती.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२२:२०-२२—बलामाविरुद्ध यहोवाचा कोप का भडकला? यहोवाने संदेष्टा बलाम याला सांगितले होते, की त्याने इस्राएलांना शाप देऊ नये. (गणना २२:१२) तरीसुद्धा बलाम, बालाकाच्या सेवकांबरोबर इस्राएलांना शाप द्यायला गेला. बलामाला मवाबी राजाला खूष करून त्याच्याकडून बक्षीस मिळवायचे होते. (२ पेत्र २:१५, १६; यहूदा ११) बलामाला बळजबरीने इस्राएलला शाप देण्याऐवजी आशीर्वाद देण्यास भाग पाडण्यात आले तेव्हाही त्याने, बआलची उपासना करणाऱ्‍या स्त्रियांद्वारे इस्राएली पुरुषांना फुसलावता येईल असे सुचवून राजाची मर्जी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. (गणना ३१:१५, १६) बलामाच्या तत्त्वशून्य लोभामुळे देवाचा कोप त्याच्यावर भडकला.

३०:६-८—एक ख्रिस्ती पुरुष आपल्या पत्नीने घेतलेली शपथ रद्द करू शकतो का? शपथांच्या बाबतीत, यहोवा आता आपल्या उपासकांशी व्यक्‍तिगतरीत्या व्यवहार करतो. उदाहरणार्थ, यहोवाला समर्पण करणे ही व्यक्‍तिगत शपथ आहे. (गलतीकर ६:५) ही शपथ बाजूला सारण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार पतीला नाही. परंतु, पत्नीने देवाच्या वचनाविरुद्ध किंवा तिच्या पतीप्रती असलेल्या जबाबदाऱ्‍यांविरुद्ध असलेली शपथ घेण्याचे टाळले पाहिजे.

आपल्याकरता धडे:

२५:११. यहोवाच्या उपासनेच्या बाबतीत फीनहासने आपल्यापुढे किती उत्तम उदाहरण मांडले आहे! मंडळी स्वच्छ राखण्याच्या आपल्या इच्छेने आपल्याला, मंडळीत चालणाऱ्‍या कोणत्याही प्रकारच्या घोर अनैतिक कार्याबद्दल ख्रिस्ती वडिलांना सांगण्यास प्रवृत्त करू नये का?

३५:९-२९. एखाद्याच्या हातून चुकून मनुष्यवध झाला असेल तर त्याला आपले घर सोडून काही काळासाठी शरणपुरात राहावे लागत होते या वस्तुस्थितीवरून आपण हे शिकतो, की जीवन पवित्र आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.

३५:३३. निष्पाप लोकांच्या सांडलेल्या रक्‍ताने भ्रष्ट झालेल्या पृथ्वीचे प्रायश्‍चित, रक्‍तपात करणाऱ्‍या मनुष्याच्या रक्‍तानेच होऊ शकते. पृथ्वीचे परादीसमध्ये रूपांतर करण्याआधी यहोवा पृथ्वीवरील दुष्टांचा नाश करेल हे किती उचित आहे!—नीतिसूत्रे २:२१, २२; दानीएल २:४४.

देवाचे वचन सक्रिय आहे

आपण, यहोवाचा आणि त्याच्या लोकांमध्ये जबाबदार पदासाठी नेमलेल्यांचा आदर केला पाहिजे. गणनाच्या पुस्तकात याच सत्यावर जास्त जोर देण्यात आला आहे. आज मंडळीत शांती व ऐक्य टिकवून ठेवण्याकरता किती महत्त्वपूर्ण धडा!

गणनाच्या पुस्तकात लिहून ठेवलेल्या घटनांवरून दिसून येते, की आपल्या आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष करणारे किती सहजरीत्या कुरकूर, अनैतिकता, मूर्तिपूजा यांसारखे अपराध करू शकतात. बायबलच्या या पुस्तकातील काही उदाहरणांचा आणि धड्यांचा, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये सेवा सभेतील स्थानीय गरजा या भागासाठी उपयोग करता येऊ शकेल. खरेच, “देवाचे वचन” आपल्या जीवनात “सजीव, सक्रिय” आहे.—इब्री लोकांस ४:१२.

[२४, २५ पानांवरील चित्र]

निवासमंडपावरील एका चमत्कारिक मेघाद्वारे यहोवाने इस्राएली लोकांना तळ देण्याविषयी आणि कूच करण्याविषयी सूचना दिल्या

[२६ पानांवरील चित्रे]

यहोवा आपल्या आज्ञाधारकतेस पात्र आहे आणि आपण त्याच्या प्रतिनिधींचा आदर केला पाहिजे, अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो