व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कृतज्ञ भावनेने स्वीकारा मोठ्या मनाने द्या

कृतज्ञ भावनेने स्वीकारा मोठ्या मनाने द्या

कृतज्ञ भावनेने स्वीकारा मोठ्या मनाने द्या

आपला प्रेमळ स्वर्गीय पिता यहोवा, याला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे. त्याच्या सर्व सेवकांची तो नितांत काळजी घेतो, अशी हमी त्याच्या वचनात दिली आहे. (१ पेत्र ५:७) त्याची सेवा विश्‍वासूपणे करता यावी म्हणून तो त्यांना निरनिराळ्या मार्गांनी मदत करून त्याची काळजी व्यक्‍त करतो. (यश. ४८:१७) विशेषकरून, आपल्यासमोर समस्या येतात तेव्हा त्याने पुरवलेल्या मदतीचा आपण लाभ घ्यावा, अशी त्याची इच्छा आहे. ही गोष्ट किती खरी आहे, हे मोशेच्या नियमशास्त्रातून दिसून येते.

नियमशास्त्रात यहोवाने, अनाथ, विधवा व उपरी असलेल्या ‘गरीबांसाठी’ एक प्रेमळ योजना केली होती. (लेवी. १९:९, १०; अनु. १४:२९) आजही, त्याच्या सेवकांपैकी काहींना त्यांच्या सहउपासकांकडून मदतीची गरज लागेल, हे यहोवाला माहीत आहे. (याको. १:२७) त्यामुळे, यहोवा ज्यांना मदत देण्यास प्रवृत्त करतो अशांकडून मदत स्वीकारण्यास त्याच्या कोणत्याही सेवकाने कचरू नये. पण ही मदत स्वीकारताना आपण योग्य मनोवृत्ती बाळगली पाहिजे.

याचबरोबर देवाच्या वचनात असेही म्हटलेले आहे, की त्याच्या सर्व सेवकांपुढे मदत करण्याचीही संधी आहे. जेरूसलेमच्या मंदिरात येशूने पाहिलेल्या त्या ‘दरिद्री विधवेचा’ अहवाल आठवा. (लूक २१:१-४) नियमशास्त्रात विधवांसाठी यहोवाने सांगितलेल्या प्रेमळ योजनांचा ती देखील लाभ घेत असावी. ती, स्वतः गरीब होती तरीपण तिची आठवण आपण, मदत घेणारी विधवा म्हणून नव्हे तर दान देणारी विधवा म्हणून करतो. तिच्या देण्याच्या मनोवृत्तीमुळे तिला नक्कीच आनंद झाला असावा. म्हणूनच येशूने म्हटले: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रे. कृत्ये २०:३५) ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही देखील, ‘देण्याची’ वृत्ती अंगी बाणवून यातून मिळणारा आनंद कसा उपभोगू शकता?—लूक ६:३८.

‘मी परमेश्‍वराचा कसा उतराई होऊ?’

“परमेश्‍वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ?” असा प्रश्‍न स्तोत्रकर्त्याला पडला होता. (स्तो. ११६:१२) यहोवाने त्याच्यावर कोणते उपकार केले होते? त्याला “उपद्रव व क्लेश” होत होते तेव्हा यहोवाने त्याला सांभाळले होते. शिवाय, यहोवाने त्याचा “जीव मरणापासून” वाचवला होता. म्हणून त्याला यहोवाची परतफेड करायची होती. पण ही परतफेड तो कशी करू शकत होता? त्याने म्हटले: “परमेश्‍वराला केलेले नवस मी . . . फेडीन.” (स्तो. ११६:३, ४, ८, १०-१४) त्याने यहोवाला दिलेली सर्व वचने पाळण्याचा व त्याची सर्व कर्तव्ये पार पाडण्याचा निश्‍चय करून तो ही परतफेड करू इच्छित होता.

तुम्हीही असेच करू शकता. देवाच्या नीतिनियमांचे सदैव पालन करण्याद्वारे तुम्ही देखील स्तोत्रकर्त्याप्रमाणे यहोवाचे उतराई होऊ शकता. यासाठी तुम्हाला यहोवाच्या उपासनेला आपल्या जीवनात प्रथम स्थान द्यावे लागेल व हरएक बाबतीत देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे कार्य करावे लागेल. (उप. १२:१३; गलती. ५:१६-१८) तसे पाहायला गेलो तर आपण कोणीही, यहोवाने आपल्यासाठी केलेल्या गोष्टींसाठी त्याची पूर्णपणे परतफेड कधीच करू शकत नाही. पण आपण जेव्हा त्याची पूर्ण मनाने सेवा करतो तेव्हा त्याचे “मन आनंदित” होते. (नीति. २७:११) यहोवाचे मन आनंदित करण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे, नाही का?

मंडळीच्या उभारणीस हातभार लावा

ख्रिस्ती मंडळीचा तुम्हाला अनेक मार्गांनी लाभ झाला आहे, हे तुम्ही निश्‍चितच कबूल कराल. मंडळीद्वारे यहोवाने आपल्याला भरपूर आध्यात्मिक अन्‍न दिले आहे. सत्य मिळाल्यानंतर खोट्या धार्मिक शिकवणींपासून व आध्यात्मिक अज्ञानापासून तुमची सुटका झाली. (योहा. ८:३२) ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ आयोजित केलेल्या मंडळीच्या सभांद्वारे, संमेलनांद्वारे व अधिवेशनांद्वारे तुम्हाला, पृथ्वीवर येणाऱ्‍या नंदनवनात अनंतकाळचे जीवन मिळवून देणारे ज्ञान प्राप्त झाले. या नंदनवनात कोणत्याही प्रकारचे दुःख नसेल. (मत्त. २४:४५-४७) देवाच्या मंडळीद्वारे तुम्हाला मिळालेल्या व पुढे मिळणाऱ्‍या लाभांची तुम्ही यादी करू शकता का? मग या सर्व आशीर्वादांच्या बदल्यात तुम्ही मंडळीला काय देऊ शकाल?

प्रेषित पौलाने असे लिहिले: “आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे. त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्‍या प्रत्येक सांध्याच्या योगे, सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते, आणि प्रत्येक अंग आपआपल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धि करून घेते.” (इफिस. ४:१५, १६) ही वचने प्रामुख्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लागू होत असली तरी, त्या वचनांत सांगितलेल्या गोष्टी आजच्या सर्व ख्रिश्‍चनांनाही लागू होऊ शकतात. होय, ख्रिस्ती मंडळीचा प्रत्येक सदस्य, मंडळीच्या उभारणीस हातभार लावू शकतो. ते कसे?

नेहमी इतरांशी उत्तेजनदायक व आध्यात्मिक तजेला मिळेल अशा प्रकारचे संभाषण करून आपण मंडळीच्या उभारणीस हातभार लावू शकतो. (रोम. १४:१९) बंधूभगिनींबरोबरच्या आपल्या सर्व व्यवहारांमध्ये देवाच्या पवित्र आत्म्याचे फळ दाखवून आपणही ‘शरीराच्या वृद्धिस’ हातभार लावू शकतो. (गलती. ५:२२, २३) शिवाय, ‘सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करण्यासाठी’ आपण सतत संधी शोधू शकतो. (गलती. ६:१०; इब्री १३:१६) मंडळीतला प्रत्येक सदस्य मग तो वृद्ध असो अथवा तरुण, बंधू असो अथवा बहीण, ‘प्रीतीमध्ये शरीराची रचना’ करण्यात भाग घेऊ शकतो.

मंडळीद्वारे केल्या जाणाऱ्‍या जीवन वाचवण्याच्या कार्यात भाग घेण्याकरताही आपण आपल्या कलाकौशल्यांचा, शक्‍तीचा व साधनसंपत्तीचा उपयोग करू शकतो. जीवन वाचवणारा संदेश ‘तुम्हाला फुकट मिळाला, तर तुम्हीही तो फुकट द्या,’ असे येशू ख्रिस्ताने म्हटले. (मत्त. १०:८) तेव्हा, राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या या महत्त्वाच्या कार्यात जोमाने सहभाग घ्या. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) पण, हे कार्य करण्यास तुम्हाला काही अडचण आहे का? येशूने जिच्याविषयी सांगितले ती गरीब विधवा आठवा. तिने जे काही दिले होते ते खूपच कमी होते. तरीपण इतरांपेक्षा तिनेच जास्त दिले, असे येशूने म्हटले. कारण, तिची जितकी ऐपत होती तितके तिने दिले होते.—२ करिंथ. ८:१-५, १२.

योग्य मनोवृत्ती बाळगून मदत स्वीकारा

काही वेळा कदाचित तुम्हाला मंडळीकडील मदतीची गरज असेल. या व्यवस्थीकरणामुळे तुमच्यावर येणारे दबाव तुम्हाला आणखी सहन करता येत नाहीत, असे तुम्हाला वाटत असेल तर मंडळीकडून मिळणारी मदत घेण्यास कधीही कचरू नका. ‘मंडळीचे पालन’ करण्याकरता यहोवाने अनुभवी व प्रेमळ वडिलांची योजना केली आहे. तुम्हाला जेव्हा परीक्षांचा किंवा हालअपेष्टांचा सामना करावा लागतो तेव्हा हे वडील तुम्हाला मदत करावयास तत्पर असतात. (प्रे. कृत्ये २०:२८) कोणत्याही कठीण प्रसंगी तुमचे सांत्वन करण्याची, तुम्हाला आधार देण्याची व तुमचे संरक्षण करण्याची या वडिलांची व इतर बंधूभगिनींची इच्छा आहे.—गलती. ६:२; १ थेस्सलनी. ५:१४.

पण तुम्हाला जेव्हा मदत मिळते तेव्हा ती तुम्ही योग्य मनोवृत्ती बाळगून स्वीकारली पाहिजे. तुम्हाला मिळत असलेला आधार नेहमी कृतज्ञतेने स्वीकारा. बंधूभगिनींकडून मिळणारा हा आधार खरेतर, देव आपल्याला दाखवत असलेली अपात्र कृपा आहे, असे समजा. (१ पेत्र ४:१०) अशी मनोवृत्ती बाळगणे महत्त्वाचे का आहे? कारण आपण उपकारांची जाणीव नसणाऱ्‍या जगातील लोकांप्रमाणे कोणतीही मदत स्वीकारू इच्छित नाही.

संतुलित व समंजस राहा

फिलिप्पै मंडळीला लिहिलेल्या पत्रात पौलाने तीमथ्यविषयी असे लिहिले: “तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही.” पण पौलाने असे का म्हटले? “कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात,” असे तो पुढे म्हणाला. (फिलिप्पै. २:२०, २१) पौलाने केलेले हे महत्त्वपूर्ण विधान लक्षात ठेवून आपणही आज ‘स्वतःच्याच गोष्टींमध्ये’ पूर्णपणे बुडून जाण्याचे कसे टाळू शकतो?

आपल्या समस्या सोडवण्यास आपली मदत करण्याकरता आपण बांधवांचे साहाय्य मागतो तेव्हा त्यांनी आपल्यासाठी वेळ काढलाच पाहिजे, अशी आपण हक्काची मागणी करू शकत नाही. का नाही? समजा, तातडीच्या प्रसंगी एखाद्या बांधवाने आपल्याला आर्थिक रीत्या मदत केली असेल तर आपण त्याचे उपकार कधीच विसरणार नाही. पण मग आपण त्या बांधवाकडून, त्याने आपल्याला पैशांची मदत केलीच पाहिजे असा हट्ट करू का? मुळीच नाही. तसेच, आपले प्रेमळ बांधव आपल्याला मदत करायला सदैव तयार असतात म्हणून आपण त्यांच्याकडे अवास्तव मागण्या करणार नाही. आपण संतुलित राहू व समंजसपणा दाखवू. बंधूभगिनी आपल्यासाठी जे काही करतील ते त्यांनी आनंदाने करावे, असे आपल्या सर्वांना वाटते.

तुमचे ख्रिस्ती बंधू व भगिनी तुम्हाला मदत करायला नेहमी तयार आहेत, यात काही शंकाच नाही. तरीपण, कधीकधी त्यांना तुम्हाला हवी असलेली मदत देता येणार नाही. अशा वेळी तुम्ही यहोवाकडे पाहू शकता. स्तोत्रकर्त्याला जसे यहोवाने परीक्षांमध्ये सांभाळले तसेच तो तुम्हाला देखील सांभाळेल, ही खातरी तुम्ही बाळगू शकता.— स्तो. ११६:१, २; फिलिप्पै. ४:१०-१३.

म्हणून यहोवा तुम्हाला, तुम्ही त्रासात व दुःखात असता त्यावेळी खासकरून जी काही मदत देतो ती निसंकोचपणे स्वीकारा. (स्तो. ५५:२२) तुम्ही ही मदत घेतली पाहिजे, असे यहोवाला वाटते. पण यासोबतच तुम्ही ‘संतोषाने देणारे’ असले पाहिजे, अशीही तो अपेक्षा करतो. यास्तव, खऱ्‍या उपासनेच्या वृद्धीसाठी तुम्हाला जी काही मदत देता येते ती “मनात ठरविल्याप्रमाणे” द्या. (२ करिंथ. ९:६, ७) असे केल्यास तुम्ही, कृतज्ञ भावनेने स्वीकाराल व मोठ्या मनाने द्याल.

[३१ पानांवरील चौकट/चित्रे]

“परमेश्‍वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ?”—स्तो. ११६:१२.

▪ ‘सर्वांचे बरे करण्यासाठी’ संधी शोधा

▪ नेहमी इतरांशी उत्तेजनदायक व आध्यात्मिक तजेला मिळेल अशा प्रकारचे संभाषण करा

▪ शिष्य बनवण्याच्या कार्यात तुमच्या परीने होता होईल तितका भाग घ्या