व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकमेकांना मनापासून क्षमा करा

एकमेकांना मनापासून क्षमा करा

एकमेकांना मनापासून क्षमा करा

“एकमेकांचे सहन करा, आणि . . . आपसात क्षमा करा.” —कलस्सै. ३:१३.

तुमचे उत्तर काय असेल?

आपण क्षमा करण्यास तयार का असले पाहिजे?

क्षमाशील असणे महत्त्वाचे आहे हे येशूने कोणत्या दृष्टान्ताद्वारे स्पष्ट केले?

एकमेकांना मनापासून क्षमा केल्याने आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?

१, २. तुम्ही क्षमा करण्यास तयार आहात की नाही याविषयी विचार करणे उचित का आहे?

 यहोवा देव पापाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि आपल्या हातून पाप घडते तेव्हा तो कशी प्रतिक्रिया दाखवतो हे आपल्याला त्याच्या वचनातून शिकायला मिळते. त्याच्या वचनात क्षमाशीलतेबद्दलही बरेच काही सांगितले आहे. मागील लेखात आपण पाहिले होते, की दाविदाने व मनश्‍शेने पश्‍चात्तापी मनोवृत्ती दाखवल्यामुळे यहोवाने त्यांना क्षमा केली. त्यांनी जे केले होते त्याविषयी त्यांना मनस्वी दुःख झाल्यामुळे त्यांनी आपले पाप कबूल केले आणि वाईट कृत्ये करण्याचे सोडून दिले. त्यांनी मनापासून पश्‍चात्ताप केला. परिणामस्वरूप, यहोवा त्यांच्याप्रती पुन्हा कृपा दाखवण्यास तयार झाला.

आता आपण क्षमाशीलतेचे एका वेगळ्या दृष्टिकोनातून परीक्षण करू या. मनश्‍शेने ज्या निर्दोष लोकांचा बळी घेतला होता त्यांमध्ये तुमचा कोणी कुटुंबीय असता, तर मनश्‍शेबद्दल तुमच्या भावना काय असत्या? तुम्ही मनश्‍शेला क्षमा करू शकला असता का? आजच्या काळाकरता हा एक उचित प्रश्‍न आहे, कारण आपण एका अन्यायी, हिंसक आणि स्वार्थी जगात राहत आहोत. तर मग, एका ख्रिस्ती व्यक्‍तीने क्षमाशील मनोवृत्ती का विकसित केली पाहिजे? आणि तुम्हाला वाईट किंवा अन्यायी वागणूक मिळाल्यास भावनांवर नियंत्रण ठेवून, यहोवा तुमच्याकडून जी अपेक्षा करतो त्याप्रमाणे वागण्यास, आणि क्षमाशील असण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

क्षमाशील का असले पाहिजे?

३-५. (क) क्षमाशील असण्याच्या महत्त्वावर विचार करण्यास आपल्या श्रोत्यांना मदत करण्यासाठी येशूने कोणता दृष्टान्त दिला? (ख) मत्तय १८:२१-३५ यात नमूद असलेल्या दृष्टान्तातून येशूने कोणता मुद्दा स्पष्ट केला?

आपल्याला कुटुंबातील सदस्यांसोबत, मित्रांसोबत, इतरांसोबत आणि यहोवासोबत शांतीपूर्ण संबंध टिकवून ठेवायचे असतील, तर आपले मन दुखावणाऱ्‍यांना, मग ते ख्रिस्ती मंडळीचे सदस्य असोत किंवा नसोत, क्षमा करण्यास तयार असणे आवश्‍यक आहे. इतरांनी कितीही वेळा आपले मन दुखावले, तरी ख्रिश्‍चनांनी क्षमा करण्यास तयार असले पाहिजे हे बायबलमध्ये सूचित केले आहे. ही अपेक्षा वाजवी का आहे हे दाखवण्यासाठी येशूने कर्जदार असलेल्या एका दासाचा दृष्टान्त दिला.

या दासावर त्याच्या मालकाचे असलेले कर्ज, एका मजुराच्या ६,००,००,००० दिवसांच्या मजुरीइतके होते; तरीसुद्धा त्याच्या मालकाने त्याचे हे कर्ज माफ केले. त्यानंतर या दासाला त्याच्याच सोबतीचा एक दास भेटला, ज्याच्यावर त्याचे फक्‍त १०० दिवसांच्या मजुरीइतके कर्ज होते. कर्जदार असलेल्या दासाने खूप गयावया केली. पण मालकाने ज्याचे मोठे कर्ज माफ केले होते, त्या दासाने आपल्या सोबतीच्या दासाला अगदी लहानसे कर्ज न फेडल्यामुळे तुरुंगात टाकले. दासाच्या अशा मनोवृत्तीमुळे मालक संतापला. “मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हतीस काय?,” त्याने विचारले. “मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला [माफ करण्यास तयार नसलेल्या दासाला] हालहाल करणाऱ्‍यांच्या हाती दिले.”—मत्त. १८:२१-३४.

या दृष्टान्तातून येशूने कोणता मुद्दा स्पष्ट केला? दृष्टान्ताच्या शेवटी त्याने म्हटले: “जर तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील.” (मत्त. १८:३५) मुद्दा अगदी स्पष्ट आहे. अपरिपूर्ण मानव या नात्याने आयुष्यभरात आपल्या हातून अनेक पापे घडली आहेत. यावरून स्पष्टपणे दिसून येते की यहोवाच्या नीतिमियमांनुसार तंतोतंत वागण्यात आपण खूपच उणे पडतो. तरीसुद्धा यहोवा आपल्याला क्षमा करण्यास, आपल्या मागच्या चुका विसरून जाण्यास व आपल्याला नव्याने सुरुवात करू देण्यास तयार असतो. त्यामुळे, ज्या कोणाला यहोवासोबत मैत्री करण्याची इच्छा आहे त्यानेही आपल्या सहमानवांच्या चुकांची क्षमा केलीच पाहिजे. डोंगरावरील प्रवचनात येशूने म्हटल्याप्रमाणे: “जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”—मत्त. ६:१४, १५.

६. क्षमा करणे नेहमीच सोपे का नसते?

‘हे सगळं बोलण्यापुरतं ठीक आहे, पण प्रत्यक्षात असं करणं सोपं नाही,’ असे कदाचित तुम्ही म्हणाल. याचे कारण म्हणजे व्यक्‍तिशः आपले मन दुखावले जाते तेव्हा सहसा आपल्या भावनांवर आपले नियंत्रण राहत नाही. राग, विश्‍वासघात झाल्याची भावना, न्याय मिळवण्याची इच्छा, इतकेच काय तर एखाद्याच्या मनात सूडभावनादेखील येऊ शकते. किंबहुना, मन दुखावणाऱ्‍या व्यक्‍तीला आपण कधीच क्षमा करू शकणार नाही असेही काहींना वाटते. जर तुम्हालाही असे वाटत असेल, तर यहोवाला आपल्या सेवकांकडून अपेक्षित असलेली क्षमाशील वृत्ती तुम्ही स्वतःमध्ये कशा प्रकारे उत्पन्‍न करू शकता?

आपल्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा

७, ८. इतरांच्या वागण्यामुळे तुमचे मन दुखावले असल्यास, क्षमाशील रीतीने प्रतिक्रिया दाखवण्यास कोणती गोष्ट तुम्हाला साहाय्य करेल?

एखादी व्यक्‍ती आपल्याशी वाईट वागते, किंवा ती आपल्याशी वाईट वागली असे आपल्याला वाटते तेव्हा सहसा आपण खूपच अस्वस्थ होतो. राग या विषयावर केलेल्या एका अभ्यासात एका तरुणाने आपला अनुभव सांगितला: “एकदा . . . माझा राग अनावर झाला आणि मी कधीच परत यायचं नाही असं मनाशी ठरवून घराबाहेर पडलो. बाहेर कोवळं ऊन पडलं होतं. मी एका सुंदर रस्त्यावरून दूरपर्यंत चालत गेलो. त्या नीरव शांततेमुळं आणि सुंदर वातावरणामुळं हळूहळू माझं मन शांत झालं. काही तासांनी मला पस्तावा झाला आणि मी घरी परतलो. माझा राग निवळला होता.” या अनुभवावरून हेच दिसून येते, की जर तुम्ही थोडा वेळ जाऊ दिला, स्वतःला शांत होऊ दिले आणि थंड डोक्याने परिस्थितीकडे पाहिले तर तुम्हाला अक्षमाशीलपणे वागणे टाळता येईल. शिवाय, तुमच्या प्रतिक्रियेचा तुम्हाला नंतर पस्तावा होणार नाही.—स्तो. ४:४; नीति. १४:२९; याको. १:१९, २०.

पण, नकारात्मक भावना तुमच्या मनातून जात नसतील तर काय? तुम्हाला नेमका कशाचा राग आला आहे हे निश्‍चित करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अन्यायी वागणूक देण्यात आली किंवा तुमचा अपमान करण्यात आला असे तुम्हाला वाटत आहे का? किंवा एखाद्या व्यक्‍तीने जाणूनबुजून तुम्हाला नुकसान पोचवण्याचा प्रयत्न केला असे तुम्हाला वाटल्यामुळे तुमचे मन दुखावले आहे का? त्याची किंवा तिची कृती खरोखरच इतकी वाईट होती का? तुम्हाला नेमके काय वाटत आहे, आणि तसे का वाटत आहे हे समजून घेतल्यामुळे सर्वात चांगली व उचित प्रतिक्रिया कोणती ठरेल यावर बायबलच्या दृष्टिकोनातून विचार करणे तुम्हाला शक्य होईल. (नीतिसूत्रे १५:२८; १७:२७ वाचा.) अशा प्रकारे विचार केल्यामुळे तुम्हाला भावनांच्या आहारी जाऊन नव्हे, तर तारतम्याने विचार करणे आणि क्षमाशील वृत्ती दाखवणे शक्य होईल. अशा रीतीने समस्या हाताळणे कदाचित तुम्हाला सोपे जाणार नाही. पण असे करण्याद्वारे तुम्ही देवाच्या वचनाला तुमच्या “मनातील विचार व हेतू” पारखण्यास आणि यहोवाच्या क्षमाशील वृत्तीचे अनुकरण करण्याकरता तुमचे मार्गदर्शन करण्यास वाव देता.—इब्री ४:१२.

तुम्ही इतके मनाला लावून घेतले पाहिजे का?

९, १०. (क) तुमचे मन दुखावण्याचा प्रयत्न केला गेला आहे असे तुम्हाला वाटते तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल? (ख) सकारात्मक आणि क्षमाशील मनोवृत्तीमुळे जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो?

जीवनात कितीतरी गोष्टींमुळे एखाद्याचा राग भडकू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही कारने जाताना दुसरी एक कार तुमच्या कारला जवळजवळ धडकतेच. अशा वेळी तुमची प्रतिक्रिया काय असेल? रागाच्या भरात एका ड्रायव्हरने दुसऱ्‍या ड्रायव्हरला मारल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण, एक ख्रिस्ती या नात्याने तुम्ही असे नक्कीच करणार नाही.

१० त्याऐवजी थोडे थांबून जे घडले त्याविषयी विचार करणे किती चांगले ठरेल. कदाचित तुमची नजर चुकली असेल, आणि त्यामुळे जे घडले त्यासाठी तुम्हीही काही अंशी जबाबदार असाल. दुसऱ्‍या कारमध्ये काहीतरी बिघाड झाला असेल. या घटनेच्या बाबतीत सांगण्याचा मुद्दा हा की समजूतदारपणा दाखवण्याद्वारे, खुल्या मनाने विचार करण्याद्वारे आणि क्षमा करण्यास तयार असण्याद्वारे राग, नैराश्‍य व इतर नकारात्मक भावनांची तीव्रता आपण कमी करू शकतो. उपदेशक ७:९ असे म्हणते: “मन उतावळे होऊ देऊन रागावू नको; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो.” तेव्हा, अशा गोष्टी मनाला इतक्या लावून घेऊ नका. अनेक प्रसंगी, आपण असा विचार करतो की आपल्याला नुकसान पोचवण्यासाठी जाणूनबुजून असे करण्यात आले आहे; पण असे काहीच नसते. सहसा अशा गोष्टी अपरिपूर्णतेमुळे किंवा गैरसमज झाल्यामुळे घडतात. तेव्हा इतरांच्या मन दुखावणाऱ्‍या कृतींबद्दल किंवा बोलण्याबद्दल खुल्या मनाने विचार करा आणि प्रेमळपणे त्यांना क्षमा करण्यास तयार असा. असे केल्यास, तुम्ही आनंदी व्हाल.—१ पेत्र ४:८ वाचा.

तुमची शांती तुमच्याकडे परत येईल

११. सुवार्तेप्रती लोकांनी कोणतीही प्रतिक्रिया दाखवली, तरीही राज्याचे उद्‌घोषक या नात्याने आपला प्रतिसाद कसा असला पाहिजे?

११ क्षेत्र सेवेत असताना कोणी तुमचा अपमान केल्यास, तुम्ही स्वतःच्या भावनांवर कशा प्रकारे नियंत्रण ठेवू शकता? येशूने आपल्या ७० शिष्यांना प्रचार करण्याकरता पाठवले तेव्हा ते ज्या घरांना भेटी देतील त्या प्रत्येक घरावर शांती असो असे म्हणण्यास त्याने त्यांना सांगितले. येशूने म्हटले: “तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील; नसला तर तुम्हाकडे ती परत येईल.” (लूक १०:१, ५, ६) लोक जेव्हा आपल्या संदेशाप्रती सकारात्मक प्रतिक्रिया दाखवतात तेव्हा आपल्याला आनंद होतो; कारण त्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो. पण, कधीकधी लोक आपल्यावर भडकतात. अशा वेळी काय करता येईल? येशूने म्हटले की तरीसुद्धा आपली शांती टिकून राहिली पाहिजे. लोकांनी आपल्यासोबत कसाही व्यवहार केला, तरीही प्रत्येक वेळी आपण शांत मनाने तेथून निघाले पाहिजे. घरमालकाने अपमान केल्यामुळे जर आपण चिडलो, तर येशूने ज्या शांतीविषयी सांगितले ती टिकवून ठेवणे आपल्याला शक्य होणार नाही.

१२. इफिसकर ४:३१, ३२ मधील पौलाच्या शब्दांच्या सामंजस्यात आपण कसे वागले पाहिजे?

१२ सेवाकार्यादरम्यानच नव्हे, तर सर्वच परिस्थितींत आपली शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. साहजिकच, इतरांना क्षमा करण्यास तयार असण्याचा अर्थ हा नाही, की तुम्ही इतरांची वाईट वागणूक मुकाट्याने सहन केली पाहिजे किंवा तिच्यामुळे होणाऱ्‍या नुकसानीला क्षुल्लक लेखले पाहिजे. त्याउलट, क्षमा करण्याचा अर्थ, अशा वाईट वागणुकीबद्दल मनात राग न बाळगणे आणि आपली शांती टिकवून ठेवणे असा होतो. काही जण नकारात्मक गोष्टींवर आणि इतरांकडून आपल्याला किती वाईट वागणूक मिळाली आहे यावर सतत विचार करण्याद्वारे त्यांचा आनंद गमावून बसतात. अशा नकारात्मक विचारांना तुमच्या भावनांवर नियंत्रण करू देऊ नका. मनात राग बाळगल्यास तुम्ही आनंदी असू शकत नाही हे लक्षात ठेवा. म्हणून क्षमा करण्यास तयार असा!—इफिसकर ४:३१, ३२ वाचा.

यहोवाला आनंद होईल अशा प्रकारे वागा

१३. (क) एक ख्रिस्ती व्यक्‍ती कशा प्रकारे आपल्या शत्रूच्या “मस्तकावर निखाऱ्‍यांची रास” करू शकते? (ख) वाईट वागणूक दिली जाते तेव्हा सौम्यतेने वागल्यास काय घडू शकते?

१३ काही वेळा, वाईट वागणूक देणाऱ्‍या व्यक्‍तीला तुम्ही ख्रिस्ती स्तरांविषयी जाणून घेण्यास मदत करू शकता. प्रेषित पौलाने लिहिले: “तुझा शत्रु भुकेला असल्यास त्याला खावयाला दे; तान्हेला असल्यास त्याला प्यावयाला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्‍यांची रास करिशील. वाइटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्‍याने वाइटाला जिंक.” (रोम. १२:२०, २१) तुम्हाला वाईट वागणूक दिली जाते तेव्हा तुमच्या प्रेमळ वागणुकीमुळे अगदी कठोर व्यक्‍तीदेखील सौम्य बनू शकते आणि अशा प्रकारे तिच्यातील चांगल्या गुणांना तुम्ही चालना देऊ शकता. अशा व्यक्‍तीसोबत समजूतदारपणे व सहानुभूतीने वागल्यास तुम्हाला कदाचित बायबलमधील सत्ये शिकून घेण्यास तिला मदत करता येईल. त्या व्यक्‍तीचा प्रतिसाद काहीही असो, तुम्ही सौम्यतेने वागल्यास, तुमच्या चांगल्या वागणुकीबद्दल विचार करण्याची संधी तिला मिळते.—१ पेत्र २:१२; ३:१६.

१४. एखाद्या व्यक्‍तीने तुम्हाला कितीही वाईट वागणूक दिली असली, तरी तुम्ही मनात राग का बाळगू नये?

१४ काही परिस्थितींत, काही विशिष्ट लोकांशी सहवास ठेवणे अनुचित ठरेल. यांमध्ये अशा लोकांचा समावेश होतो जे आधी ख्रिस्ती मंडळीचा भाग होते; त्यांनी पाप केले, पण पश्‍चात्ताप केला नाही. त्यामुळे त्यांना मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले. अशा एखाद्या व्यक्‍तीने जर तुम्हाला वाईट वागणूक दिली असेल, तर तिने पश्‍चात्ताप केला असला तरी तिला क्षमा करणे अतिशय कठीण जाऊ शकते. कारण, मनावर झालेल्या जखमा भरून निघण्यास वेळ लागतो. अशा परिस्थितीत, पश्‍चात्तापी मनोवृत्ती दाखवणाऱ्‍या पापी व्यक्‍तीला क्षमा करण्याची मनोवृत्ती तुम्हाला विकसित करता यावी म्हणून तुम्ही यहोवाला वारंवार मदत मागू शकता. शेवटी, दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या मनात काय आहे हे तुम्ही कसे ओळखू शकता? यहोवाच ओळखतो. तो एका व्यक्‍तीच्या मनातील विचार जाणून घेतो आणि अपराध करणाऱ्‍यांशी सहनशीलतेने वागतो. (स्तो. ७:९; नीति. १७:३) म्हणूनच बायबल असे म्हणते: “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभू म्हणतो.” (रोम. १२:१७-१९) बायबल आपल्याला सांगते, की आपण इतरांना दोषी ठरवू नये. तुम्ही एखाद्या व्यक्‍तीला दोषी ठरवल्यास, तुमचा न्याय अगदी योग्य होता असे तुम्ही खातरीने म्हणू शकता का? नाही. (मत्त. ७:१, २) पण, तुम्ही भरवसा बाळगू शकता की देव अगदी योग्यपणे न्याय करेल.

१५. कोणत्या जाणिवेमुळे वाईट वागणूक देणाऱ्‍यांबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो?

१५ एखादी व्यक्‍ती तुमच्यासोबत अन्यायीपणे वागली असून, तिने पश्‍चात्ताप केला तरी तुम्ही तिला क्षमा करू शकत नाही असे तुम्हाला वाटत असेल. अशा वेळी, तुम्ही हे आठवणीत ठेवले पाहिजे की तीदेखील वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेचा सामना करत आहे. (रोम. ३:२३) यहोवाला सर्वच अपरिपूर्ण मानवांबद्दल सहानुभूती वाटते. म्हणून, वाईट वागणूक देणाऱ्‍या व्यक्‍तीकरता प्रार्थना करणे योग्यच आहे. कारण, आपण ज्या व्यक्‍तीसाठी प्रार्थना करतो तिच्याबद्दल आपण मनात राग बाळगू शकत नाही. आणि आपल्याला वाईट वागणूक देणाऱ्‍यांप्रतीसुद्धा आपण मनात राग बाळगू नये हे येशूच्या शब्दांवरून स्पष्टपणे दिसून येते. त्याने म्हटले: “तुम्ही आपल्या वैऱ्‍यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”—मत्त. ५:४४.

१६, १७. पाप करणाऱ्‍या एका व्यक्‍तीने पश्‍चात्तापी मनोवृत्ती दाखवल्याचे मंडळीतील वडील ठरवतात तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असली पाहिजे?

१६ ख्रिस्ती मंडळीत अपराध करणाऱ्‍यांची प्रकरणे हाताळण्याची जबाबदारी यहोवाने मंडळीतील वडिलांवर सोपवली आहे. यहोवाप्रमाणे या बांधवांना एखाद्या गोष्टीची सर्वच माहिती नसते, पण ते पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे निर्णय घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. तेव्हा, यहोवाला प्रार्थनेत मदत मागितल्यानंतर ते जे निर्णय घेतात त्यांतून यहोवाचा दृष्टिकोन दिसून येतो.—मत्त. १८:१८.

१७ अशा परिस्थितीत आपण यहोवाला एकनिष्ठ राहिले पाहिजे. तर मग, एखादी व्यक्‍ती पश्‍चात्तापी मनोवृत्ती दाखवत आहे असे वडिलांनी ठरवल्यास अशा व्यक्‍तीला तुम्ही क्षमा करणार का आणि तुमचे तिच्यावर अजूनही प्रेम आहे हे दाखवणार का? (२ करिंथ. २:५-८) असे करणे कदाचित सोपे जाणार नाही, खासकरून या व्यक्‍तीने तुमच्याविरुद्ध किंवा तुमच्या प्रियजनाविरुद्ध पाप केले असल्यास. तरीसुद्धा, यहोवावर आणि तो मंडळीद्वारे ज्या प्रकारे प्रकरण हाताळतो त्यावर भरवसा ठेवण्याद्वारे तुम्ही योग्य ते करता. अशा प्रकारे तुम्ही दाखवता की तुम्ही इतरांना खरोखरच मनापासून क्षमा करता.—नीति. ३:५, ६.

१८. मनापासून क्षमा केल्याने तुम्हाला कोणते फायदे अनुभवता येतील?

१८ क्षमा करण्यास तयार नसल्यामुळे आरोग्याच्या समस्या, तणाव व संवादात अडथळे निर्माण होतात आणि नातेसंबंध विसकटतात. याउलट, मानसिक आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांचे म्हणणे आहे की क्षमाशील मनोवृत्ती दाखवल्याने अनेक फायदे होतात. क्षमा केल्याने मनात कोंडलेल्या किंवा आरोग्याला हानिकारक असलेल्या इतर नकारात्मक भावनांपासून सुटका मिळते आणि नातेसंबंध अधिक आनंदी व सुदृढ बनतात. पण, क्षमाशील असण्याचा सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे आपला स्वर्गीय पिता यहोवा याच्याशी घनिष्ट नातेसंबंध निर्माण होतो.—कलस्सैकर ३:१२-१४ वाचा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२७ पानांवरील चित्र]

येशूने सांगितलेल्या या दृष्टान्ताचा मुद्दा काय होता?

[३० पानांवरील चित्र]

ख्रिश्‍चनांकडून क्षमाशील असण्याची अपेक्षा केली जाते