व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गरीब असण्याचा अर्थ देवाचा आपल्यावर आशीर्वाद नाही असा होतो का?

गरीब असण्याचा अर्थ देवाचा आपल्यावर आशीर्वाद नाही असा होतो का?

गरीब असण्याचा अर्थ देवाचा आपल्यावर आशीर्वाद नाही असा होतो का?

देवाने प्राचीन इस्त्राएली लोकांना सांगितले होते: “तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही.” का बरे? कारण मोशेला दिलेल्या नियमशास्त्रात गरिबांची काळजी घेण्यासाठी व त्यांचे कर्ज माफ करण्यासाठी काही नियम सांगण्यात आले होते. (अनुवाद १५:१-४, ७-१०) त्यामुळे इस्त्राएली लोकांमध्ये कोणीही गरीब असणार नव्हते कारण यहोवाने त्यांना आशीर्वाद देण्याचे वचन दिले होते. पण हे आशीर्वाद त्यांना नियमांचे पालन केल्यावरच मिळणार होते व इस्त्राएली लोक नेमके तेच करण्यात उणे पडले.

याचा असा अर्थ होत नाही की जे गरीब होते त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद नव्हता व जे श्रीमंत होते त्यांच्यावर त्याचा आशीर्वाद होता. देवाचे अनेक विश्‍वासू सेवक गरीब होते. संदेष्टा आमोस एक गरीब मेंढपाळ व हंगामी कामगार होता. (आमोस १:१; ७:१४) एलीया संदेष्ट्याच्या काळात इस्त्राएल राष्ट्रात दुष्काळ पडला होता तेव्हा त्याला एक गरीब विधवा देत असलेल्या अन्‍नावर भागवावे लागले. दुष्काळादरम्यान चमत्कारिक रित्या तिचे पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही. एलीया किंवा ती विधवा दोघेही कधी श्रीमंत बनले नाहीत; यहोवाने त्यांच्या गरजेपुरते त्यांना दिले.—१ राजे १७:८-१६.

अनपेक्षित घटनांमुळे लोक एका रात्रीत अचानक कंगाल बनू शकतात. अपघातामुळे किंवा आजारपणामुळे एखाद्याचे काम करणे तात्पुरते किंवा कायमचे बंद पडू शकते. कर्त्या पुरूषाच्या मृत्यूमुळे त्याची बायको विधवा होऊ शकते, त्याची मुले अनाथ होऊ शकतात. या प्रतिकूल घटनाही देवाचा आपल्यावर आशीर्वाद नसल्याचे सुचवत नाहीत. गरिबांसाठी यहोवाला असलेली प्रेमळ काळजी आपल्याला रूथ व नामी यांच्या उदाहरणातून दिसून येते. नामी व रूथ यांची परिस्थिती त्यांच्या पतींच्या मृत्यूमुळे अगदीच हलाखीची बनली होती. पण, यहोवा देवाने त्यांना आशीर्वाद दिला व त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची त्याने तरतूद केली.—रूथ १:१-६; २:२-१२; ४:१३-१७.

यावरून गरीब असण्याचा अर्थ देवाचा आपल्यावर आशीर्वाद नाही, असा होत नाही हे स्पष्ट झाले आहे. यहोवा देवाला विश्‍वासू राहणारे त्याचे सेवक राजा दाविदाच्या शब्दांवर पूर्ण भरवसा ठेवू शकतात: “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतति भिकेस लागलेली मी पाहिली नाही.”—स्तोत्र ३७:२५. (w०९ ०९/०१)

[८ पानांवरील चित्र]

गरिबीच्या व हलाखीच्या परिस्थितीत जगतानाही नामी व रूथ या दोघींना देवाचा आशार्वाद व त्याची प्रेमळ काळजी अनुभवायला मिळाली