व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू ख्रिस्त कोण आहे?

येशू ख्रिस्त कोण आहे?

देवाच्या वचनातून शिका

येशू ख्रिस्त कोण आहे?

तुमच्या मनात उद्‌भवलेले प्रश्‍न आणि या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला बायबलमध्ये कोठे वाचायला मिळतील हे या लेखात सांगितले आहे. यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबरोबर या उत्तरांची चर्चा करण्यास आनंद होईल.

१. येशू ख्रिस्त कोण आहे?

येशूचा पृथ्वीवर जन्म होण्याआधी तो स्वर्गात एक आत्मिक व्यक्‍ती म्हणून होता. असे पूर्वी कोणत्याही मानवाच्या बाबतीत झाले नव्हते. (योहान ८:२३) देवाने सर्वात आधी येशूला निर्माण केले आणि मग त्याने इतर सर्व गोष्टींची निर्मिती करण्यात देवाला मदत केली. फक्‍त येशूलाच खुद्द देवाने निर्माण केले असल्यामुळे, त्याला देवाचा ‘एकुलता एक’ असे म्हटले आहे. येशू लोकांबरोबर देवाच्या वतीने बोलला त्यामुळे त्याला “शब्द” असेही म्हटले आहे.—योहान १:१-३, १४; नीतिसूत्रे ८:२२, २३, ३०; कलस्सैकर १:१५, १६ वाचा.

२. येशू पृथ्वीवर का आला?

यहोवा देवाने, मरीया नावाच्या एका यहुदी कुमारिकेच्या उदरात आपल्या पुत्राचे जीवन स्वर्गातून स्थलांतरीत केले. त्यामुळे येशूचा जन्म कोणत्याही मानवी पित्याकडून झाला नाही. (लूक १:३०-३५) येशू तीन कारणांसाठी पृथ्वीवर आला. (१) देवाबद्दलचे सत्य शिकवण्यासाठी, (२) देवाची इच्छा पूर्ण कशी करायची याबाबतीत आपल्यापुढे कित्ता घालण्यासाठी आणि (३) ‘खंडणी’ म्हणून आपल्या परिपूर्ण जीवनाचे बलिदान देण्यासाठी.मत्तय २०:२८; योहान १८:३७ वाचा.

३. आपल्याला खंडणीची गरज का आहे?

एखाद्या व्यक्‍तीला बंधनातून मुक्‍त करण्याकरता खंडणी दिली जाते. मृत्यू आणि म्हातारपण हे, मानवजातीसाठी असलेल्या देवाच्या उद्देशाचा भाग नव्हते. कशावरून? देवाने पहिला पुरुष आदाम याला असे सांगितले होते, की बायबल ज्याला पाप म्हणते ते जर त्याने केले तर तो मरण पावेल. म्हणजे, आदामाने पाप केले नसते तर तो कधीच मरण पावला नसता. पण आदामाने पाप केले. तो लगेच मरण पावला नाही. पाप केल्यानंतर तो कितीतरी वर्षे जिवंत राहिला खरा, पण ज्या दिवशी त्याने देवाची आज्ञा मोडली त्या दिवसापासून तो मरणाच्या पंथास लागला. (उत्पत्ति २:१६, १७; ५:५) आदामाने हे पाप आणि पापाचे वेतन मरण, त्याच्या संततीला दिले. अशा प्रकारे, आदामामुळे मरण मानवजातीत “शिरले.” या मृत्यूच्या बंधनातून सुटका होण्याकरता आपल्याला खंडणीची गरज आहे.रोमकर ५:१२; ६:२३ वाचा.

४. येशू का मरण पावला?

मृत्यूच्या बंधनातून आपली सुटका करण्यासाठी ती खंडणी देण्यास कोण समर्थ होता? आपण मरतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्याच पापांची भरपाई करतो. कोणताही अपरिपूर्ण मनुष्य इतरांच्या पापांची किंमत भरू शकत नाही.स्तोत्र ४९:७-९ वाचा.

येशूला मानवी पिता नसल्यामुळे तो परिपूर्ण होता. आणि तो मरण पावला ते, त्याच्या पापांसाठी नव्हे तर इतरांच्या पापांसाठी. यहोवाने मानवजातीवरील अतीव प्रेमापोटी आपल्या पुत्राला, त्यांच्यासाठी मरण सहन करण्यास पाठवले. आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याद्वारे व मानवजातीच्या पापांसाठी स्वतःच्या जीवनाचे अर्पण करण्याद्वारे येशूनेदेखील त्याचे प्रेम व्यक्‍त केले.योहान ३:१६; रोमकर ५:१८, १९ वाचा.

५. येशू आता काय करत आहे?

रोग्यांना बरे करण्याद्वारे, मरण पावलेल्यांना पुन्हा जिवंत करण्याद्वारे व संकटात सापडलेल्या लोकांची सुटका करण्याद्वारे येशूने तो भविष्यात मानवजातीसाठी काय काय करणार आहे त्याची एक झलक दाखवली. (लूक १८:३५-४२; योहान ५:२८, २९) येशू मरण पावल्यानंतर, यहोवाने त्याला आत्मिक व्यक्‍ती म्हणून पुन्हा जिवंत केले. (१ पेत्र ३:१८) तेव्हापासून येशू, यहोवाने त्याला संपूर्ण पृथ्वीवर राजा या नात्याने राज्य करण्याचा अधिकार देईपर्यंत यहोवाच्या उजव्या हाताला वाट पाहत राहिला. (इब्री लोकांस १०:१२, १३) आता येशू स्वर्गात राजा या नात्याने राज्य करीत आहे आणि पृथ्वीवरील त्याचे अनुयायी ही आनंदाची बातमी संपूर्ण जगभरात सांगत आहेत.दानीएल ७:१३, १४; मत्तय २४:१४, वाचा.

लवकरच येशू सर्व दुःखांचा आणि या दुःखांना कारणीभूत असलेल्यांचा अंत करण्यासाठी राजा या नात्याने आपल्या शक्‍तीचा उपयोग करणार आहे. येशूवर विश्‍वास ठेवणारे व त्याच्या आज्ञांचे पालन करणारे कोट्यवधी लोक, पृथ्वीवरील नंदनवनात जीवनाचा आनंद लुटतील.स्तोत्र ३७:९-११, वाचा. (w११-E ०३/०१)

जास्त माहितीसाठी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ४ पाहा.

[२९ पानांवरील चित्र]

येशूवर विश्‍वास ठेवणारे व त्याच्या आज्ञांचे पालन करणारे कोट्यवधी लोक, पृथ्वीवरील नंदनवनात जीवनाचा आनंद लुटतील