व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंथरूण पाहून पाय पसरा शक्य आहे का?

अंथरूण पाहून पाय पसरा शक्य आहे का?

अंथरूण पाहून पाय पसरा शक्य आहे का?

“अंथरूण पाहून पाय पसरा.” ही म्हण आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. या म्हणीचा असा अर्थ होतो, की आपण आपल्या मिळकतीनुसार अर्थात आपल्या ऐपतीनुसार आपला खर्च ठेवला पाहिजे.

आपल्या ऐपतीनुसार खर्च ठेवणे, हे बोलणे सोपे आहे परंतु वास्तवात मात्र त्यानुसार वागणे कठीण आहे. लोक जर या साध्याशा म्हणीप्रमाणे खरोखरच वागले तर ते कर्जबाजारी होणार नाहीत. पण असे वागणे शक्य आहे का? याबाबतीत आपल्याला व्यावहारिक मार्गदर्शन कुठे मिळू शकेल? बायबल आपल्याला याबाबतीत अगदी उत्तम मार्गदर्शन देते. याविषयी थोडक्यात पाहू या.

बायबलमधील मदतगार तत्त्वे

खर्चाचे नियोजन करण्यास मदत करू शकणारी अनेक व्यावहारिक तत्त्वे बायबलमध्ये आहेत. यांपैकी काही तत्त्वांचे आपण परीक्षण करू या. ही तत्त्वे तुम्हाला, अंथरूण पाहून पाय पसरायला कशी मदत करू शकतात, ते पाहा.

महिन्याचा खर्च लिहून काढा. पैशांचा चांगला उपयोग करायचा असेल तर आधी आपल्याला, आपल्या हातात किती पैसा येतो आणि तो आपण कसा खर्च करतो, हे माहीत असले पाहिजे. बायबलमध्ये म्हटले आहे: “काळजीपूर्वक केलेल्या योजनांमुळे फायदा होतो. पण जर तुम्ही काळजी घेतली नाही आणि घाई घाईत गोष्टी केल्या तर तुम्ही गरीब व्हाल.” (नीतिसूत्रे २१:५, ईझी टू रीड) या वचनात काळजीपूर्वक योजना करण्याबद्दल जो सल्ला दिला आहे तो अंमलात आणण्याकरता आपण लिफाफ्यांचा उपयोग करू शकतो. आपण खर्चाचे वर्गीकरण करू शकतो आणि प्रत्येक लिफाफ्यावर “महिन्याचे सामान,” “भाडे,” किंवा “कपडालत्ता,” असे लिहू शकतो. तुम्ही या साध्या-सोप्या पद्धतीचा उपयोग केला अथवा दुसऱ्‍या कुठल्याही पद्धतीचा उपयोग केला तर तुम्हाला, तुमचे पैसे नेमके कोठे खर्च होतात हे कळेल. अशा प्रकारे तुम्ही सुख-चैनीच्या वस्तूंना नव्हे तर जीवनावश्‍यक गोष्टींना प्राधान्य देऊ शकाल.

हेवा करण्याचे टाळा. विकसनशील देशांतील अनेकांना, औद्योगिक विकास झालेल्या राष्ट्रांतील लोकांकडे असलेल्या गोष्टींची हाव असते. पुष्कळ लोकांना, त्यांचे शेजारी दिखावा करत असलेल्या वस्तूंचा मोह होतो. हा एक पाश ठरू शकतो. वास्तविक पाहता, तुमच्या शेजाऱ्‍यालाही त्या वस्तू परवडत नव्हत्या तरीपण त्याने कर्जबाजारी होऊन त्या आणल्या असाव्यात. मग दुसऱ्‍याचे पाहून आपण का म्हणून विनाकारण कर्जात पडायचे? बायबल आपल्याला असा इशारा देते: “झटपट श्रीमंत होण्याची इच्छा बाळगणारा हावऱ्‍या डोळ्यांचा आहे; आपल्याला दारिद्र्‌य केव्हा गाठील, हे त्याला माहीत नसते.”—नीतिसूत्रे २८:२२, सुबोध भाषांतर.

मोठ्या गोष्टींची अपेक्षा करू नका. यिर्मया यहोवाचा एक सेवक होता. त्याचा सचिव बारूख याला यहोवा देवाने असा सल्ला दिला, की ‘तू मोठ्या गोष्टींची अपेक्षा करू नकोस.’ (यिर्मया ४५:५, ईझी टू रीड) मराठीत एक म्हण आहे, “खिशात नाही पै आणि बाजार करती लै.” या म्हणीनुसार आपण जर खिशाला न परवडणाऱ्‍या गोष्टींच्या मागे लागलो तर कर्जाच्या ओझ्याखाली दबून जाऊ. एका एशियन डेव्हलपमेंट बँक रिपोर्टनुसार फिलिपीन्समधील जवळजवळ एक तृतीयांश लोक आणि भारतातील लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक लोक, आशियासाठी असलेल्या दारिद्र्‌य रेषेखाली म्हणजे दर दिवसाला १.३५ यु.एस. डॉलर्स (जवळजवळ ६० रुपये) इतक्या कमी पैशावर गुजारा करतात. लोकांना इतका तुटपुंजा पगार मिळत असेल तर गरजेच्या गोष्टी घेण्यावरच त्यांनी आपले लक्ष केंद्रित करणे शहाणपणाचे ठरेल. पण हेच तत्त्व श्रीमंत राष्ट्रांतील लोकांनाही लागू होऊ शकते. त्यांनी जर आपले लक्ष गरजेच्या गोष्टींवर केंद्रित ठेवले तर कर्जबाजारी झाल्यामुळे होणाऱ्‍या मानसिक यातना तेही टाळू शकतात.

जितके लागते तितक्यातच समाधान माना. हे, आपले जीवन साधे ठेवण्याबद्दल बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्यानुसार आहे. बायबलमध्ये १ तीमथ्य ६:८ या वचनात असा सल्ला देण्यात आला आहे: “आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” जगातील काही आनंदी लोकांकडे खूप कमी पैसा आहे; तरीपण त्यांच्याजवळ जितके आहे तितक्यातच, म्हणजे फक्‍त भौतिक वस्तूंतच नव्हे तर कुटुंब व मित्र यांच्याकडून मिळणाऱ्‍या प्रेमामुळे ते समाधानी आहेत.—नीतिसूत्रे १५:१७.

विनाकारण कर्जबाजारी होऊ नका. “जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो, तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो,” हे बायबलमधील वाक्य किती खरे आहे! (नीतिसूत्रे २२:७, सुबोध भाषांतर.) काही परिस्थितींमध्ये कर्ज घेणे टाळता येत नसले तरी, हवे ते विकत घेण्यासाठी विनाकारण कर्ज घेणारे लोक जणू काय, स्वतःहून स्वतःच्या गळ्यात धोंड बांधून घेतात. लोक जेव्हा क्रेडिट कार्ड वापरतात तेव्हा खासकरून हे खरे आहे. टाईम नावाच्या मासिकात असे म्हटले होते: “एकदा का आपल्या हातात कार्ड पडले, की आपण पैशाच्या बाबतीत बेपर्वा होतो आणि दिसेल ती वस्तू विकत घेऊ लागतो.” फिलिपीन्समध्ये राहणारा एरिक म्हणतो: “मी जेव्हा क्रेडिट कार्ड वापरतो तेव्हा बहुतेकदा नेहमीपेक्षा जास्त गोष्टी विकत घेतो. यामुळं, बिल भरायची वेळ येते तेव्हा महिन्याच्या खर्चावर त्याचा परिणाम होतो.” तेव्हा, क्रेडिट कार्डाचा वापर करण्याच्या बाबतीत आपण किती सावधगिरी बाळगली पाहिजे!—२ राजे ४:१; मत्तय १८:२५.

पैशांची बचत करून वस्तू विकत घ्या. पैशांची बचत करून मग वस्तू विकत घेणे ही जरा जुनी पद्धत वाटत असली तरीसुद्धा, आर्थिक समस्यांपासून दूर राहण्याचा हा सुज्ञ मार्ग आहे. असे केल्याने पुष्कळ जण कर्जबाजारी होण्यापासून आणि त्यामुळे होणाऱ्‍या डोकेदुखीतून जसे की जास्त व्याज फेडण्याच्या त्रासापासून मुक्‍त असतात. कारण, एक व्यक्‍ती जेव्हा काहीही उधारीवर विकत घेते तेव्हा त्याचे व्याजही वाढत असते. बायबलमध्ये मुंगीला ‘अत्यंत शहाणी’ म्हटले आहे. कारण ती, पुढे वापरता यावे म्हणून ‘उन्हाळ्यातच आपले अन्‍न साठवून ठेवते.’—नीतिसूत्रे ६:६-८; ३०:२४, २५.

इतरांपासून शिका

आतापर्यंत आपण चर्चा केलेली बायबलमधील तत्त्वे कागदावर ठीक वाटतील, पण ती वास्तवात लोकांना खरोखरच, अंथरूण पाहून पाय पसरण्यास मदत करत आहेत का? ज्यांनी या सल्ल्याचे पालन केले आहे व त्यांच्यासमोर आलेल्या आर्थिक समस्यांवर यश मिळवले आहे अशा काहींचे आपण अनुभव पाहू या.

डिओसडाडो यांना चार मुले आहेत. अलीकडच्या आर्थिक मंदीमुळे कुटुंबाच्या गरजा पुरवणे कठीण झाल्याचे ते कबूल करतात. तरीपण महिन्याच्या खर्चाचा हिशेब ठेवण्याचे महत्त्व त्यांना माहीत आहे. ते म्हणतात: “माझ्या कमाईच्या पै न्‌ पैचा मी हिशेब ठेवतो. माझा पैसा कुठं खर्च होतो त्याची मी यादी ठेवली आहे.” डॅनिलोही असेच करतो. तो व त्याची बायको एक लहानसा व्यवसाय करत होते, पण तो बुडाला. तरीपण महिन्याच्या खर्चाचा काळजीपूर्वक हिशेब ठेवल्यामुळे ते त्यांना लागणाऱ्‍या वस्तू विकत घेऊ शकतात. तो म्हणतो: “महिन्याला हातात किती पैसा येतो आणि किती जातो हे आम्हाला माहीत आहे. त्याच्या आधारावर, आम्ही किती पैसे खर्च करू शकतो याची सविस्तर चर्चा करतो.”

महिन्याच्या खर्चाचा हिशेब ठेवण्याकरता काहींना, काही बाबतीत काटछाट करणे आवश्‍यक वाटले आहे. मर्ना नावाची एक विधवा तीन मुलांचे संगोपन करत आहे. ती म्हणते: “ख्रिस्ती सभांना सार्वजनिक वाहतुकीनं जाण्याऐवजी मी व माझी मुलं आता चालत जातो.” साधी जीवनशैली ठेवण्याचे महत्त्व शिकण्यास मर्नाने आपल्या मुलांना मदत केली आहे. ती म्हणते: “१ तीमथ्य ६:८-१० मधील तत्त्वाचं पालन करायचा प्रयत्न करून मी मुलांपुढं स्वतःचं उदाहरण मांडते. त्या वचनात, आपल्याजवळ जितकं आहे त्यात समाधानी राहण्याचं महत्त्व समजावण्यात आलं आहे.”

दोन मुलांचे वडील असलेल्या जेराल्डनेदेखील असेच केले. ते म्हणतात: “आमच्या कौटुंबिक बायबल अभ्यासाच्या वेळी आम्ही, अशा ख्रिस्ती बंधुभगिनींच्या अनुभवांची चर्चा करतो ज्यांनी खरोखरच महत्त्वाच्या गोष्टी, जसे की आध्यात्मिक गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. याचा परिणाम चांगला झाला आहे. कारण आता आमची मुलं, बिनमहत्त्वाच्या गोष्टींसाठी हट्ट करत नाहीत.”

जॅनेट अविवाहित आहे. फिलिपीन्समध्ये ती पूर्ण वेळ स्वयंसेवक म्हणून बायबल शिकवते. अलीकडेच तिची नोकरी सुटली, तरीपण ती तिच्या ऐपतीनुसार जगत आहे. ती म्हणते: “मी योग्य प्लॅनिंग करते आणि माझ्याजवळ असलेल्या पैशाचा व साधनांचा चांगला उपयोग करते. महागड्या मॉल्समध्ये जाण्याऐवजी मी अशा दुकानांमध्ये जाते जिथे वस्तू स्वस्त दरात मिळतात. मला जर वस्तू कमी किंमतीत मिळत असतील तर मी विनाकारण त्या वस्तू जास्त पैसे देऊन कशाला विकत घेऊ? शिवाय मी विचार न करता म्हणजे, वस्तू दिसली की घे विकत असं कधीही करत नाही.” पैसे साठवून ठेवण्यात सुज्ञपणा आहे असे जॅनेटला वाटते. “कधीकधी माझ्याजवळ जरा जास्त पैसे असले, मग ते थोडेसेच का होईना, मी ते जपून ठेवते; म्हणजे, पुढे कधी काही अनपेक्षित प्रसंग आलाच तर मला ते वापरता येऊ शकतील,” असे ती म्हणते.

आधी ज्याचा उल्लेख करण्यात आला त्या एरिकने क्रेडिट कार्डबद्दल असे म्हटले: “मी फक्‍त इमरजन्सीतच क्रेडिट कार्ड वापरतो.” डिओसडाडो याजशी सहमत आहे. तो म्हणतो: “मी माझं क्रेडिट कार्ड मुद्दामहून ऑफिसमध्येच ठेवतो.”

अंथरूण पाहून पाय पसरणे शक्य आहे

पुष्कळ लोकांना दिसून येत आहे की, बायबल हे फक्‍त यहोवाच्या जवळ येण्याचा निर्णय घ्यायलाच मदत करत नाही, तर त्यात आर्थिक बाबींविषयीची अनेक मार्गदर्शक तत्त्वेदेखील आहेत ज्यांचा आपल्याला फायदा होऊ शकतो. (नीतिसूत्रे २:६; मत्तय ६:२५-३४) या लेखात चर्चा करण्यात आलेल्या बायबल तत्त्वांचे पालन केल्यास व या तत्त्वांचे पालन केल्यामुळे फायदा झालेल्यांकडून शिकून घेतल्यास, आपल्यालादेखील आपले अंथरूण पाहून पाय पसरणे अर्थात आपल्या ऐपतीनुसार आपला खर्च ठेवणे शक्य होईल. असे केल्याने आपण, आज लाखो लोक सहन करत असलेल्या मानसिक पीडा व चिंता टाळू शकतो. (w११-E ०६/०१)

[१० पानांवरील संक्षिप्त आशय]

‘किती पैसे खर्च करू शकतो याची आम्ही सविस्तर चर्चा करतो’

[११ पानांवरील संक्षिप्त आशय]

‘ख्रिस्ती सभांना सार्वजनिक वाहतुकीनं जाण्याऐवजी आम्ही आता चालत जातो’

[११ पानांवरील संक्षिप्त आशय]

‘वस्तू दिसली की घे विकत, असं मी कधीही करत नाही’