व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय तीन

पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?

पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?
  • मानवजातीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?

  • देवाला आव्हान कसे करण्यात आले?

  • भविष्यात पृथ्वीवरील जीवन कसे असेल?

१. पृथ्वीबद्दल देवाचा उद्देश काय आहे?

पृथ्वीबद्दल देवाचा उद्देश खरोखरच अद्‌भुत आहे. पृथ्वी आनंदी, निरोगी लोकांनी भरावी अशी यहोवाची इच्छा आहे. बायबल म्हणते, की ‘देवाने . . . एदेनात बाग लाविली’ आणि त्याने “दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे, . . . जमिनीतून उगवविली.” त्यानंतर त्याने पहिला पुरुष आदाम व पहिली स्त्री हव्वा यांना निर्माण केले आणि त्यांना हे सुंदर घर देऊन म्हटले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.” (उत्पत्ति १:२८; २:८, ९, १५) मानवांना मुले व्हावीत व त्यांनी बागेसमान घराच्या सीमा संपूर्ण पृथ्वीवर वाढवाव्यात आणि प्राण्यांची देखभाल करावी, असा देवाचा उद्देश होता.

२. (क) पृथ्वीबद्दल देवाचा उद्देश निश्‍चित पूर्ण होईल, हे आपल्याला कसे समजते? (ख) मानवांनी सर्वदा जगण्याविषयी बायबल काय म्हणते?

पृथ्वीवरील परादीसमध्ये लोकांनी राहावे, हा यहोवा देवाचा उद्देश कधी सफल होईल असे तुम्हाला वाटते का? देव म्हणतो: “मी बोलतो तसे घडवूनहि आणितो.” (यशया ४६:९-११; ५५:११) होय, देव जे उद्देशितो ते तो निश्‍चित पूर्ण करेल! तो म्हणतो, की त्याने “[पृथ्वी] निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.” (यशया ४५:१८) पृथ्वीवर कोणत्या प्रकारच्या लोकांनी राहावे, आणि किती काळपर्यंत त्यांनी जगावे अशी देवाची इच्छा होती? बायबल याचे उत्तर देते: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”​—स्तोत्र ३७:२९; प्रकटीकरण २१:३, ४.

३. आज पृथ्वीवर कोणत्या दुःखद गोष्टी घडत आहेत आणि यामुळे कोणते प्रश्न उभे राहतात?

पण आतापर्यंत तर असे घडलेले नाही. आता लोक आजारी पडून मरतात; ते एकमेकांबरोबर लढतात व एकमेकांची हत्याही करतात. कुठेतरी काहीतरी नक्कीच बिघडले. पण, आज आपण पृथ्वी जशी पाहतो तशी ती व्हावी असे देवाने निश्‍चितच उद्देशिले नव्हते! मग काय झाले? देवाचा उद्देश पूर्ण का झाला नाही? मानवाने लिहिलेले कोणतेही इतिहासाचे पुस्तक आपल्याला या प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकत नाही कारण समस्येची सुरुवात स्वर्गात झाली होती.

एका शत्रूचा उदय

४, ५. (क) हव्वेबरोबर सर्पाच्या माध्यमाने वास्तविकतेत कोण बोलले? (ख) पूर्वी सभ्य, प्रामाणिक असलेली व्यक्ती नंतर चोर कशी बनू शकते?

बायबलचे पहिले पुस्तक आपल्याला देवाच्या एका विरोधकाविषयी सांगते ज्याने एदेन बागेत आपले तोंड दाखवले. त्याला “सर्प” म्हटले आहे, परंतु तो केवळ एक साधासुधा प्राणी नव्हता. बायबलच्या शेवटल्या पुस्तकात त्याची ओळख, “सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान” अशी करून देण्यात आली आहे. त्यालाच “जुनाट साप” म्हटले आहे. (उत्पत्ति ३:१; प्रकटीकरण १२:९) एक कुशल माणूस जसा कळसूत्री बाहुली बोलत असल्याचे भासवतो, तसेच या शक्तिशाली देवदूताने किंवा अदृश्य आत्मिक प्राण्याने हव्वेशी बोलण्यासाठी एका सर्पाचा उपयोग केला. देवाने मानवांसाठी पृथ्वी निर्माण केली तेव्हा हा देवदूत निश्‍चितच उपस्थित असावा.​—ईयोब ३८:​४, ७.

पण यहोवाची सर्व सृष्टी परिपूर्ण आहे, तर मग या ‘दियाबलाला’ किंवा या ‘सैतानाला’ कोणी बनवले? साध्यासोप्या शब्दांत सांगायचे तर, देवाच्या शक्तिशाली आत्मिक पुत्रांपैकी एकाने स्वतःला दियाबल बनवले. ते कसे शक्य आहे? बघा, एकेकाळी सभ्य व प्रामाणिक असलेली व्यक्ती नंतर चोर बनू शकते. ते कसे? ती व्यक्ती आपल्या मनात चुकीच्या इच्छा उत्पन्न होऊ देते. या व्यक्तीने जर त्या चुकीच्या गोष्टी मनात घोळत राहू दिल्या तर ती इच्छा प्रबळ होते. आणि मग संधी मिळते तेव्हा ती व्यक्ती ज्या चुकीच्या गोष्टीचा विचार करत होती त्यानुसार कार्य करू लागते.​—याकोब १:​१३-१५.

६. देवाचा एक शक्तिशाली आत्मिक पुत्र दियाबल सैतान कसा बनला?

दियाबल सैतानाच्या बाबतीत हेच घडले. देवाने आदाम आणि हव्वेला फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा, असे जे सांगितले होते ते त्याने ऐकले असावे. (उत्पत्ति १:​२७, २८) तेव्हा त्याच्या मनात असा विचार आला: ‘या सर्व लोकांनी देवाऐवजी माझी उपासना केली तर किती बरं होईल!’ अशाप्रकारे एक चुकीची इच्छा त्याच्या मनात जागृत झाली. कालांतराने, त्याने त्यानुसार कार्य केले; हव्वेला फसवण्यासाठी त्याने तिला देवाविषयी लबाड गोष्टी सांगितल्या. (उत्पत्ति ३:​१-५) अशाप्रकारे तो “दियाबल” म्हणजे “खोटे बोलणारा” बनला. त्याच वेळेस तो “सैतान” म्हणजे “विरोधक” बनला.

७. (क) आदाम व हव्वा का मरण पावले? (ख) आदामाचे सर्व वंशज म्हातारे का होतात व मरण पावते?

लबाड्या व फसवणुकीचा उपयोग करून दियाबल सैतानाने आदाम व हव्वेला देवाची आज्ञा मोडण्यास प्रवृत्त केले. (उत्पत्ति २:१७; ३:६) परिणामतः, देवाने सांगितल्याप्रमाणे ते कालांतराने मरण पावले; कारण देवाने त्यांना सांगितले होते, की जर त्यांनी त्याची आज्ञा मोडली तर ते मरण पावतील. (उत्पत्ति ३:​१७-१९) आदामाने पाप केल्यानंतर तो अपरिपूर्ण झाला त्यामुळे त्याच्या सर्व संततीला त्याच्याकडून पाप मिळाले. (रोमकर ५:१२) हे समजण्यासाठी ब्रेडच्या साच्याचे उदाहरण घ्या. ब्रेडचा साचा कोठे दबलेला असेल तर त्यात तयार होणारा ब्रेड कसा निघेल? प्रत्येक ब्रेड दबलेलाच निघेल. ब्रेड जसे साच्याचे रूप घेतो तसेच प्रत्येक मानवाला आदामाची अपरिपूर्णता वारशाने मिळाली आहे. म्हणूनच सर्व मानव म्हातारे होऊन मरून जातात.​—रोमकर ३:२३.

८, ९. (क) सैतानाने काय आव्हान केले? (ख) देवाने बंडखोरांना लगेचच नाश का केले नाही?

सैतानाने आदाम आणि हव्वेला देवाविरुद्द पाप करण्यास प्रवृत्त केले तेव्हा खरे तर तो देवाविरुद्ध बंड पुकारत होता. तो यहोवाच्या शासन करण्याच्या पद्धतीला आव्हान करत होता. तो जणू काय म्हणत होता: ‘देव वाईट शासक आहे. तो लबाड आहे आणि आपल्या प्रजेला तो चांगल्या गोष्टींपासून वंचित ठेवतो. मानवांना देवाच्या शासनाची गरज नाही. ते स्वतः, चांगले काय आणि वाईट काय हे ठरवू शकतात. मी जर राज्य केले तर माझ्या सत्तेखाली ते आनंदात राहतील.’ देवाने या अपमानजनक आव्हानाला कसे हाताळायला हवे होते? काही जण म्हणतात, साधी गोष्ट आहे, देवाने सर्व बंडखोरांचा नाश करायला हवा होता. पण नाश केल्यामुळे सैतानाच्या आव्हानाला उत्तर मिळाले असते का? देवाची शासन करण्याची पद्धत बरोबर आहे हे यामुळे सिद्ध झाले असते का?

यहोवाला न्यायाची परिपूर्ण जाणीव असल्यामुळे त्याने तिथल्या तिथे या बंडखोरांचा नाश केला नाही. सैतानाच्या आव्हानाला समाधानकारकरीत्या उत्तर देण्याकरता व दियाबल लबाड आहे हे सिद्ध करून दाखवण्याकरता वेळ द्यावा लागेल, असे देवाने ठरवले. त्यामुळे देवाने काही काळासाठी सैतानाच्या प्रभावाखाली मानवांना स्वतःवर राज्य करू देण्याचे ठरवले. यहोवाने असे का केले आणि हे वादविषय सोडवण्याकरता त्याने इतका काळ का जाऊ दिला याची चर्चा या पुस्तकाच्या ११ व्या अध्यायात करण्यात आली आहे. आता आपण या गोष्टीचा विचार करू या: सैतानाने तर आदाम आणि हव्वेसाठी काही चांगले केले नव्हते. मग त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवणे योग्य होते का? दुसरीकडे पाहता, त्यांच्याजवळ असलेले सर्व काही ज्याने त्यांना दिले होते तो यहोवा देव, क्रूर व लबाड आहे, असा त्यांनी विचार करणे बरोबर होते का? तुम्ही काय केले असते?

१०. सैतानाच्या आव्हानाला उत्तर देताना तुम्ही यहोवाची बाजू कशी घेऊ शकता?

१० या प्रश्नांवर विचार करणे चांगले आहे कारण आज आपल्यातील प्रत्येकासमोर हा वादविषय आहे. होय, सैतानाच्या आव्हानाला उत्तर देण्याकरता तुम्हाला यहोवाची बाजू घेण्याची संधी आहे. तुम्ही यहोवाला आपला शासक स्वीकारू शकता आणि सैतान लबाड आहे हे सिद्ध करण्यासाठी यहोवाला साथ देऊ शकता. (स्तोत्र ७३:२८; नीतिसूत्रे २७:११) पण दुःखाची गोष्ट अशी आहे, की या जगातील कोट्यवधी लोकांपैकी खूप कमी लोक अशी निवड करतात. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, सैतान या जगावर राज्य करत आहे, असे बायबल खरोखरच शिकवते का?

या जगावर कोण राज्य करतो?

जगाची सर्व राज्ये सैतानाच्या मालकीची नसती तर त्याने ती येशूला देऊ केली असती का?

११, १२. (क) सैतान या जगाचा शासक आहे, हे येशूला मोहात पाडण्याच्या त्याच्या प्रयत्नावरून कसे स्पष्ट होते? (ख) सैतान या जगाचा अधिपती आहे हे आणखी कशावरून सिद्ध होते?

११ सैतान या जगाचा शासक आहे, याबाबतीत येशूला जराही शंका नव्हती. एकदा एका चमत्कारिक मार्गाने सैतानाने येशूला “जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले.” सैतानाने त्याला वचन दिले: “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन.” (मत्तय ४:८, ९; लूक ४:५, ६) विचार करा. सैतान या सर्व राज्यांचा शासक नसता तर, ‘मी हे सगळे काही तुला देईन’ असे आमीष तो खरेच येशूला दाखवू शकत होता का? जगाची सर्व सरकारे सैतानाची आहेत, हे येशूने नाकारले नाही. जर ही सरकारे सैतानाची नसती तर निश्‍चितच येशूने तसे म्हटले असते.

१२ हे खरे आहे, की यहोवाच सर्वसमर्थ देव, या अद्‌भुत विश्वाचा निर्माणकर्ता आहे. (प्रकटीकरण ४:११) तरीपण, बायबलमध्ये कुठेच यहोवा देव किंवा येशू ख्रिस्त या जगाचे शासक आहेत असे म्हटलेले नाही. उलट, येशूने सैतानाला “ह्या जगाचा अधिकारी” असे स्पष्टपणे संबोधले. (योहान १२:३१; १४:३०; १६:११) बायबल तर दियाबल सैतानाला ‘ह्या युगाचे दैवत’ असेही म्हणते. (२ करिंथकर ४:३, ४) या विरोधकाविषयी किंवा सैतानाविषयी ख्रिस्ती प्रेषित योहानाने लिहिले: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.”​—१ योहान ५:१९.

सैतानाच्या जगाचा नाश कसा केला जाईल

१३. एका नव्या जगाची आपल्याला गरज का आहे?

१३ वर्षे जसजशी सरत चालली आहेत तसतशी या जगातील परिस्थिती भीतीदायक होत चालली आहे. लढाया करणारी सैन्ये, अप्रामाणिक राजकीय पुढारी, दांभिक धार्मिक नेते, निर्ढावलेले गुन्हेगार यांची या जगात बचबच झाली आहे. हे संपूर्ण जग सुधारणा करण्याच्या पलिकडे आहे. बायबल सांगते, की एक असा काळ फार जवळ आला आहे जेव्हा देव या दुष्ट जगाचा नायनाट करेल; हे तो हर्मगिद्दोन नावाच्या आपल्या युद्धाकरवी करणार आहे. यानंतर एक धार्मिक नवे जग येणार आहे.​—प्रकटीकरण १६:​१४-१६.

१४. देवाने आपल्या राज्याचा शासक होण्याकरता कोणाची निवड केली आहे आणि हे कशाप्रकारे भाकीत करण्यात आले होते?

१४ आपल्या स्वर्गीय राज्याचा किंवा सरकाराचा शासक होण्याकरता यहोवा देवाने येशू ख्रिस्ताची निवड केली आहे. फार पूर्वी बायबलमध्ये असे भाकीत करण्यात आले: “आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यावर सत्ता राहील; त्याला . . . शांतीचा अधिपति म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.” (यशया ९:६, ७) या सरकाराविषयी येशूने आपल्या अनुयायांना अशाप्रकारे प्रार्थना करायला शिकवले: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) या पुस्तकात आपण नंतर पाहणार आहोत, की देवाचे राज्य या जगातील सर्व सरकारांना काढून टाकेल आणि ते सर्वदा टिकेल. (दानीएल २:४४) मग देवाचे राज्य पृथ्वीला परादीस बनवेल.

नवे जग जवळ आले आहे!

१५. “नवी पृथ्वी” म्हणजे काय?

१५ बायबल आपल्याला आश्वासन देते: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची [देवाच्या] वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३; यशया ६५:१७) बायबल “पृथ्वी” असा उल्लेख करते तेव्हा कधीकधी त्याचा अर्थ पृथ्वीवर राहणारे लोक असा होतो. (उत्पत्ति ११:१) तेव्हा, नीतिमान “नवी पृथ्वी” म्हणजे देवाची स्वीकृती मिळालेला लोकांचा एक समाज.

१६. देवाची स्वीकृती ज्यांना मिळते त्यांना कोणते एक अमूल्य बक्षीस मिळणार आहे, आणि ते आपल्याला मिळावे म्हणून आपण काय केले पाहिजे?

१६ येशूने अभिवचन दिले, की येणाऱ्या नवीन जगात देवाची स्वीकृती मिळालेल्यांना ‘सार्वकालिक जीवनाचे’ बक्षीस मिळणार आहे. (मार्क १०:३०) कृपया आपले बायबल उघडून योहान ३:१६ आणि १७:३ ही वचने वाचा; सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी आपण काय केले पाहिजे असे येशू म्हणतो ते पाहा. येणाऱ्या परादीस पृथ्वीवर देवाकडून हे अद्‌भुत बक्षीस मिळण्यास जे पात्र ठरतात ते कोणकोणत्या आशीर्वादांचा उपभोग घेतील हे बायबलमधून पाहा.

१७, १८. संपूर्ण पृथ्वीवर शांती व सुरक्षितता असेल याची आपण खात्री कशी बाळगू शकतो?

१७ दुष्टाई, युद्धे, गुन्हेगारी आणि हिंसाचार कायमचा गेलेला असेल. “दुर्जन नाहीसा होईल; . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील.” (स्तोत्र ३७:१०, ११) पृथ्वीवर शांतीचे वास्तव्य असेल कारण देव ‘दिगंतापर्यंत लढाया बंद करील.’ (स्तोत्र ४६:९; यशया २:४) मग “न्यायी भरभराटीस येईल आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत उदंड शांती होईल;” म्हणजे कायमसाठी शांती असेल!​—स्तोत्र ७२:​७, पं.र.भा.

१८ यहोवाचे उपासक सुरक्षित वातावरणात राहतील. बायबल काळांतील इस्राएली लोक जोपर्यंत देवाच्या आज्ञेत होते तोपर्यंत ते सुरक्षित होते. (लेवीय २५:​१८, १९) अशी सुरक्षितता परादीसमध्येही असेल. किती आनंददायक काळ असेल तो!​—यशया ३२:१८; मीखा ४:४.

१९. देवाच्या नवीन जगात विपुल अन्न असेल, असे आपण का म्हणतो?

१९ अन्नटंचाई राहणार नाही. स्तोत्रकर्त्याने असे गायिले: ‘भूमीत भरपूर पीक येईल. पर्वतांच्या शिखरांवर ते डोलेल.’ (स्तोत्र ७२:​१६) यहोवा देव आपल्या धार्मिक लोकांना आशीर्वादित करेल आणि ‘भूमी आपला उपज देईल.’​—स्तोत्र ६७:६.

२०. संपूर्ण पृथ्वी परादीस बनेल, याची आपण खात्री का बाळगू शकतो?

२० संपूर्ण पृथ्वी परादीस बनेल. एकेकाळी पापी मानवांनी नासाडी केलेल्या भूमीवर टुमदार नवीन घरे आणि बागा बनवल्या जातील. (यशया ६५:​२१-२४; प्रकटीकरण ११:१८) काळाच्या ओघात, भूमीच्या ज्या ठिकाणी मनुष्यवस्ती आहे त्या भागाचा विस्तार होत होत शेवटी संपूर्ण पृथ्वी एदेन बागेसारखी सुंदर आणि उत्पादनशील बनेल. देव ‘आपली मूठ उघडून सर्व प्राणिमात्रांची इच्छा पुरी करत राहण्याचे’ थांबवणार नाही.​—स्तोत्र १४५:१६.

२१. मानवांमध्ये व प्राण्यांमध्ये शांती असेल हे कशावरून आपल्याला कळते?

२१ मानवांमध्ये व प्राण्यांमध्ये शांती असेल. जंगली व पाळीव प्राणी एकत्र चरतील. हिंस्र प्राण्यांपासून लहान मुलांना देखील घाबरण्याचे कारण राहणार नाही.​—यशया ११:​६-९; ६५:२५.

२२. आजारपणाचे काय होईल?

२२ आजारपण नाहीसे होईल. येशू, पृथ्वीवर असताना त्याने लोकांना जसे बरे केले तसे तो देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा या नात्याने कितीतरी मोठ्या प्रमाणावर करेल. (मत्तय ९:३५; मार्क १:​४०-४२; योहान ५:​५-९) तेव्हा “‘मी रोगी आहे,’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.”​—यशया ३३:२४; ३५:५, ६.

२३. पुनरुत्थानामुळे आपण सर्व हर्षित का होऊ?

२३ मृत प्रिय जणांना पुन्हा जिवंत केले जाईल व पुन्हा कधीही न मरण्याची आशा त्यांना मिळेल. मृत्यूनिद्रेत असलेल्या देवाच्या स्मृतीतील सर्वांना पुन्हा जिवंत केले जाईल. होय, “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान” होणार आहे.​—प्रेषितांची कृत्ये २४:१५; योहान ५:२८, २९.

२४. परादीस पृथ्वीवर जीवन जगण्याची कल्पना तुम्हाला कशी वाटते?

२४ आपला महान निर्माणकर्ता यहोवा देव याच्याविषयी शिकून त्याची सेवा करण्याची निवड करणाऱ्यांसाठी किती अद्‌भुत भवितव्य राखून ठेवण्यात आले आहे! तसेच ज्याच्याद्वारे आपल्याला हे सर्व आशीर्वाद मिळणार आहेत त्याच्याविषयी अर्थात येशू ख्रिस्ताविषयी आपण शिकून घेणे अत्यंत आवश्यक आहे.