नीतिवचनं २५:१-२८

  • गोष्टी गुप्त ठेवणं ()

  • योग्य वेळी बोललेले शब्द (११)

  • शेजाऱ्‍याच्या घरी सारखंसारखं जाऊ नकोस (१७)

  • शत्रूच्या डोक्यावर निखाऱ्‍यांचा ढीग (२१, २२)

  • चांगली बातमी गार पाण्यासारखी (२५)

२५  यहूदाचा राजा हिज्कीया+ याच्या लेखकांनी उतरवून घेतलेली,* शलमोनची आणखी काही नीतिवचनं:+  २  एखादी गोष्ट गुप्त ठेवणं, यात देवाचा गौरव आहे,+आणि एखाद्या गोष्टीचा शोध घेणं, यात राजांचा गौरव आहे.  ३  आकाश जितकं उंच आणि पृथ्वी जितकी खोल आहे,तितकाच राजाच्या मनाचा थांग लागणं अशक्य आहे.  ४  चांदीमधून गाळ काढून टाक,म्हणजे ती पूर्णपणे शुद्ध होईल.+  ५  राजासमोरून दुष्टाला काढून टाक,म्हणजे त्याचं राजासन न्यायामुळे स्थिर होईल.+  ६  राजासमोर स्वतःची बढाई मारू नकोस,+मोठमोठ्या लोकांमध्ये उभा राहू नकोस.+  ७  कारण एखाद्या प्रतिष्ठित माणसासमोर त्याने तुझा अपमान करण्यापेक्षा,“इकडे वर ये” असं त्याने म्हणणं चांगलं.+  ८  खटला भरण्याची घाई करू नकोस,कारण नंतर तुझ्या शेजाऱ्‍याने तुला लज्जित केलं, तर तू काय करशील?+  ९  त्याच्यासोबत झालेला वाद मिटव,+पण त्याच्या खाजगी गोष्टी* सगळ्यांना सांगू नकोस.+ १०  कारण ती गोष्ट ऐकणारा तुझा अपमान करेलआणि तू पसरवलेली वाईट गोष्ट* तुला मागे घेता येणार नाही. ११  योग्य वेळी बोललेले शब्द,चांदीच्या टोपलीत ठेवलेल्या सोन्याच्या सफरचंदांसारखे असतात.+ १२  जो ऐकून घ्यायला तयार असतो, त्याच्यासाठी ताडन देणारा बुद्धिमान माणूस,सोन्याच्या कर्णफुलासारखा आणि शुद्ध सोन्याच्या दागिन्यासारखा असतो.+ १३  कापणीच्या दिवशी जसा बर्फाचा गारवा,तसा विश्‍वासू निरोप्या त्याच्या पाठवणाऱ्‍यासाठी असतो,कारण तो आपल्या मालकाला* ताजंतवानं करतो.+ १४  ढग जमतात, वारा सुटतो पण पाऊस पडत नाही,त्याचप्रमाणे एखादा माणूस, न दिलेल्या भेटवस्तूबद्दल* नुसतीच बढाई मारतो.+ १५  सहनशील वृत्तीमुळे अधिकाऱ्‍याचं मन जिंकता येतं,आणि मऊ* जीभ हाड मोडते.+ १६  मध सापडला, तर हवा तेवढाच खा,जास्त खाल्लास, तर तू तो ओकून टाकशील.+ १७  आपल्या शेजाऱ्‍याच्या घरी सारखंसारखं जाऊ नकोस,नाहीतर तो कंटाळून तुझा द्वेष करू लागेल. १८  आपल्या शेजाऱ्‍याविरुद्ध खोटी साक्ष देणारा,सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण यांच्यासारखा असतो.+ १९  संकटाच्या काळात बेभरवशाच्या* माणसावर अवलंबून राहणं,हे तुटलेल्या दाताने चावण्यासारखं आणि लटपटत्या पायाने चालण्यासारखं आहे. २०  दुःखी मनाच्या माणसासमोर गाणी म्हणणारा,+थंडीच्या दिवशी वस्त्र काढून घेणाऱ्‍यासारखाआणि मिठावर* ओतलेल्या शिरक्यासारखा* असतो. २१  तुझा शत्रू* भुकेला असेल, तर त्याला खायला भाकर दे;तो तहानलेला असेल, तर त्याला प्यायला पाणी दे.+ २२  कारण असं केल्यामुळे तू त्याच्या डोक्यावर निखाऱ्‍यांचा ढीग रचशील,*+आणि यहोवा तुला प्रतिफळ देईल. २३  उत्तरेकडच्या वाऱ्‍यासोबत पाऊस येतोच,तसंच निंदा करणारी जीभ राग आणते.+ २४  भांडखोर* बायकोसोबत एकाच घरात राहण्यापेक्षा,छताच्या कोपऱ्‍यावर राहणं बरं!+ २५  थकलेल्या जिवाला* जसं गार पाणी,तशी दूरच्या देशाहून आलेली चांगली बातमी असते.+ २६  दुष्टासमोर हात टेकणारा* नीतिमान माणूस,गढूळ झालेल्या झऱ्‍यासारखा आणि दूषित झालेल्या विहिरीसारखा असतो. २७  खूप जास्त मध खाणं जसं चांगलं नाही,+तसंच स्वतःचा गौरव करणंही चांगलं नाही.+ २८  रागावर नियंत्रण नसलेला माणूस,तटबंदी पडलेल्या शहरासारखा असतो.+

तळटीपा

किंवा “नक्कल करून एकत्र केलेली.”
किंवा “पण इतरांची गुपितं.”
किंवा “बदनामी करण्यासाठी उठवलेली अफवा.”
किंवा “मालकाच्या जिवाला.”
शब्दशः “खोटेपणाच्या भेटवस्तूबद्दल.”
किंवा “सौम्य.”
किंवा कदाचित, “धोकेबाज.”
किंवा “क्षार.” इथे दिलेला हिब्रू शब्द सोडा या रसायनाला सूचित करतो.
एक आंबट द्रव. इंग्रजीत विनेगर.
शब्दशः “तुझा द्वेष करणारा.”
म्हणजे, त्या व्यक्‍तीची कठोर वृत्ती सौम्य करणं.
किंवा “कटकट्या.”
किंवा “हार मानणारा; हातमिळवणी करणारा.” शब्दशः “दुष्टासमोर लटपटणारा.”