व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार कुटुंबात फूट पाडतात की त्यांना जवळ आणतात?

यहोवाचे साक्षीदार कुटुंबात फूट पाडतात की त्यांना जवळ आणतात?

 आम्ही यहोवाचे साक्षीदार कुटुंबातली नाती मजबूत करायचा प्रयत्न करतो; मग ती आमच्या स्वतःच्या कुटुंबातली असोत किंवा इतरांच्या. कारण आम्हाला हे माहीत आहे की कुटुंबाची सुरुवात देवाने केली आहे. (उत्पत्ती २:२१-२४; इफिसकर ३:१४, १५) बायबलमधून तो कुटुंबांसाठी उपयोगी असलेली बरीच तत्त्वं आपल्याला शिकवतो. आणि या तत्त्वांमुळे संपूर्ण जगातल्या बऱ्‍याच लोकांना आपल्या कुटुंबातली नाती मजबूत करायला आणि आनंदी राहायला मदत मिळाली आहे.

यहोवाचे साक्षीदार कुटुंबातली नाती कशी मजबूत करतात?

 आम्ही नेहमी बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो. आणि यामुळे पती, पत्नी आणि आईवडील म्हणून आम्ही आपली जबाबदारी आणखी चांगल्या रितीने पार पाडू शकतो. (नीतिवचनं ३१:१०-३१; इफिसकर ५:२२–६:४; १ तीमथ्य ५:८) ज्या कुटुंबांमध्ये पतीपत्नीचे धार्मिक विश्‍वास वेगवेगळे असतात, अशा कुटुंबांनाही बायबलमधल्या सल्ल्यामुळे खूप मदत होते. (१ पेत्र ३:१, २) अशा एका पतीचं आणि पत्नीचं उदाहरण पाहू या, ज्यांचे जोडीदार यहोवाचे साक्षीदार बनले:

  •   “आमच्या लग्नाची पहिली सहा वर्षं खूप वाईट गेली, कारण आम्ही सतत भांडायचो. पण इवेट यहोवाची साक्षीदार बनल्यानंतर ती खूप प्रेमळपणे आणि सहनशीलपणे वागू लागली. मला वाटतं, यामुळेच आमचा घटस्फोट टळला.”​—क्लाउईर, ब्राझील.

  •   “माझे पती यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागले, तेव्हा मी त्यांचा खूप विरोध केला. कारण मला वाटायचं की साक्षीदार, कुटुंबात फूट पाडतात. पण नंतर मला कळलं, की खरंतर बायबलमुळेच आमच्या दोघांचं नातं खूप मजबूत झालंय.”​—ॲग्नेस, झांबिया.

 आम्ही लोकांना भेटून कौटुंबिक विषयांवर बायबलमधला सल्ला कसा उपयोगी पडू शकतो, हे त्यांना सांगतो. जसं की,

जोडीदार यहोवाचा साक्षीदार बनल्यामुळे कुटुंबात समस्या निर्माण होतात का?

 हो, कधीकधी समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, १९९८ मध्ये एका कंपनीने केलेल्या संशोधनाप्रमाणे त्यांना असं दिसून आलं, की २० पैकी एका कुटुंबात जोडीदार यहोवाचा साक्षीदार बनल्यामुळे कुटुंबात गंभीर समस्या निर्माण झाल्या.

 येशूने सांगितलं होतं, की त्याच्या अनुयायांना त्याच्या शिकवणींप्रमाणे वागल्यामुळे कधीकधी कुटुंबात समस्यांचा सामना करावा लागेल. (मत्तय १०:३२-३६) इतिहासकार विल ड्यूरन्ट सांगतात की रोमन साम्राज्यात “ख्रिस्ती धर्मावर कुटुंबात फूट पाडायचा आरोप लावला जायचा.” a आज यहोवाच्या साक्षीदारांवरही तोच आरोप लावला जातो. पण याचा असा अर्थ होतो का, की कुटुंबात निर्माण होणाऱ्‍या समस्यांसाठी साक्षीदार बनलेली व्यक्‍ती जबाबदार असते?

मानवी हक्कांचं युरोपियन न्यायालय

 मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयाने असं म्हटलं, की जेव्हा कुटुंबांमध्ये समस्या येतात तेव्हा सहसा साक्षीदार नसलेले कुटुंबातले सदस्य या समस्यांसाठी जबाबदार असतात. याचं कारण म्हणजे, “साक्षीदार बनलेल्या व्यक्‍तीलाही आपल्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य आहे” ही गोष्ट ते मान्य करत नाहीत. न्यायालयाने पुढे असंही म्हटलं, की “ही परिस्थिती फक्‍त यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीतच नाही, तर पतीपत्नीचे वेगवेगळे धार्मिक विश्‍वास असतात अशा सगळ्याच कुटुंबांच्या बाबतीत पाहायला मिळते.” b पण जेव्हा यहोवाच्या साक्षीदारांच्या धार्मिक विश्‍वासांचा आदर केला जात नाही, तेव्हासुद्धा ते बायबलमधल्या या सल्ल्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात: “वाइटाबद्दल कोणाचं वाईट करू नका, . . . शक्यतो, सगळ्यांसोबत होईल तितकं शांतीने राहा.”​—रोमकर १२:१७, १८.

यहोवाचे साक्षीदार दुसऱ्‍या धर्मातल्या व्यक्‍तीशी लग्न का करत नाहीत?

 कारण बायबलमध्ये अशी आज्ञा दिली आहे, की “फक्‍त प्रभूमध्ये” लग्न करा; म्हणजेच आपल्यासारखाच विश्‍वास असलेल्या व्यक्‍तीशी लग्न करा. (१ करिंथकर ७:३९) बायबलमधली ही आज्ञा व्यावहारिक दृष्टीनेही योग्यच आहे. असं का म्हणता येईल? कौटुंबिक जीवनावर आधारित असलेल्या एका नियतकालिकात, २०१० मध्ये असं म्हटलं होतं, की “ज्या कुटुंबात दोन्ही जोडीदारांचे धार्मिक विश्‍वास आणि रितीरिवाज सारखेच असतात,” त्यांचं कौटुंबिक जीवन सहसा जास्त सुखी असतं. c

 असं असलं तरी, ज्यांचे जोडीदार यहोवाचे साक्षीदार नाहीत, त्यांना आपल्या जोडीदारापासून वेगळं होण्याचा सल्ला आम्ही कधीही देत नाही. बायबलमध्ये असं म्हटलंय: “एखाद्या बांधवाची बायको विश्‍वासात नसेल, पण त्याच्यासोबत राहायला तयार असेल, तर त्याने तिला सोडू नये. आणि जर एखाद्या स्त्रीचा नवरा विश्‍वासात नसेल, पण तिच्यासोबत राहायला तयार असेल, तर तिने आपल्या नवऱ्‍याला सोडू नये.” (१ करिंथकर ७:१२, १३) यहोवाचे साक्षीदार या आज्ञेचं पालन करतात.

a सीजर ॲन्ड क्राइस्ट या पुस्तकातलं पान क्र. ६४७ पाहा.

b जेहोवाज विटनेसेस ऑफ मॉस्को ॲन्ड अदर्स वर्सेस रशिया या खटल्याच्या निकालात पान क्र. २६-२७ मधला परिच्छेद १११ पाहा.

c जर्नल ऑफ मॅरेज ॲन्ड फॅमिली, खंड ७२, क्रमांक ४, (ऑगस्ट २०१०), यातलं पान क्र. ९६३ पाहा.