व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ७

मुलांवर संस्कार कसे कराल?

मुलांवर संस्कार कसे कराल?

“ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव.”—अनुवाद ६:६, ७

यहोवाने कुटुंबाची सुरुवात केली तेव्हा मुलांची जबाबदारी त्याने आई-वडिलांवर सोपवली. (कलस्सैकर ३:२०) आई-वडील या नात्याने तुमच्या मुलाला यहोवावर प्रेम करण्यास आणि एक जबाबदार व्यक्ती बनण्यास मदत करणे हे तुमचे कर्तव्य आहे. (२ तीमथ्य १:५; ३:१५) यासोबतच, मुलांच्या मनात काय आहे हेसुद्धा जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. अर्थात, त्यासाठी तुमचे उदाहरण खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या स्वतःच्या मनावर यहोवाचे वचन कोरलेले असेल तरच तुम्ही ते मुलांच्या मनावर कोरू शकाल.—स्तोत्र ४०:८.

१ मुलांना मनातले कसे बोलू द्याल?

बायबल काय म्हणते: “प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा . . . असावा.” (याकोब १:१९) मुले तुमच्याशी कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने बोलू शकतात हे त्यांना कळू द्या. त्यांना बोलायचे असते तेव्हा तुम्ही ऐकण्यास तयार असता असे त्यांना वाटले पाहिजे. कोणताही संकोच न बाळगता मुलांना मनातले बोलता यावे असे खेळीमेळीचे, निवांत वातावरण तयार करा. (याकोब ३:१८) आई-वडिलांना मनातले सांगितल्यास ते रागावतील किंवा आपल्यालाच दोष देतील असे जर मुलांना वाटले, तर ते कदाचित मनातले बोलणार नाहीत. तेव्हा, मुलांशी धीराने वागा आणि तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे याचे त्यांना वेळोवेळी आश्वासन द्या.—मत्तय ३:१७; १ करिंथकर ८:१.

तुम्ही काय करू शकता:

  • मुलांना तुमच्याशी बोलायचे असते तेव्हा त्यांना वेळ द्या

  • समस्या उद्भवतात तेव्हाच नव्हे, तर नियमितपणे त्यांच्याशी संवाद साधा

२ त्यांना नेमके काय म्हणायचे ते समजून घ्या

बायबल काय म्हणते: “बोलण्याकडे लक्ष देणाऱ्याचे कल्याण होते.” (नीतिसूत्रे १६:२०, मराठी कॉमन लँग्वेज) कधीकधी, मुलांच्या मनात नेमके काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी केवळ त्यांच्या शब्दांकडे लक्ष देऊन चालणार नाही; तर तुम्हाला त्यांच्या भावनाही समजून घ्याव्या लागतील. मुलांना एखादी गोष्ट वाढवून सांगायची किंवा नकळत बरेच काही बोलायची सवय असते. तेव्हा, लगेच त्यांच्यावर चिडू नका. (नीतिसूत्रे १९:११) कारण बायबल म्हणते: “ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.”—नीतिसूत्रे १८:१३.

तुम्ही काय करू शकता:

  • मुले तुम्हाला काहीही सांगो, त्यांना मधेच तोडू नका किंवा तिखट प्रतिक्रिया दाखवू नका

  • तुम्ही त्यांच्या वयाचे होता तेव्हा तुम्हाला कसे वाटायचे व तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या ते आठवा

३ मुलांसमोर मतभेद नको

बायबल काय म्हणते: “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको.” (नीतिसूत्रे १:८) यहोवाने आई आणि वडील या दोघांवर मुलांची जबाबदारी सोपवली आहे. तेव्हा, मुलांना तुमचा आदर करण्यास व तुमचे ऐकण्यास शिकवा. (इफिसकर ६:१, २) आई-वडिलांचे मत एक नसेल, तर मुले ते लगेच ओळखू शकतात. (१ करिंथकर १:१०) त्यामुळे तुम्ही एकमेकांशी सहमत नसाल, तर मुलांसमोर ते दाखवू नका; नाहीतर तुमच्याबद्दल त्यांचा मनातील आदर कमी होऊ शकतो.

तुम्ही काय करू शकता:

  • मुलांना शिस्त कशी लावावी याची चर्चा करा आणि एकमतावर या

  • मुलाला शिस्त लावण्याच्या बाबतीत तुम्हा दोघांचे मत जुळत नसेल, तर तुमच्या सोबत्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा

४ योजना करा

बायबल काय म्हणते: “लहान मुलाला योग्य मार्ग निवडण्याचे शिक्षण द्या.” (नीतिसूत्रे २२:६, सुबोधभाषांतर) चांगले संस्कार आपोआप घडत नसतात. त्यामुळे मुलांवर संस्कार करण्यासाठी आई-वडिलांनी योजना करायला हवी. त्यात शिस्त लावणेही समाविष्ट असावे. (स्तोत्र १२७:४; नीतिसूत्रे २९:१७) पण शिस्त लावण्याचा अर्थ शिक्षा नव्हे, तर अमुक एक नियम का बनवण्यात आला आहे हे समजण्यास मुलाला मदत करणे असा होतो. असे केल्यास मूल सुज्ञ होईल. (नीतिसूत्रे २८:७) तसेच, मुलांना यहोवाच्या वचनावर प्रेम करण्यास आणि त्यातील तत्त्वे समजून घेण्यासही मदत करा. (स्तोत्र १:२) यामुळे मुलांना एक शुद्ध विवेक बाळगण्यास मदत मिळेल.—इब्री लोकांस ५:१४.

तुम्ही काय करू शकता:

  • देव एक खरी व्यक्ती आहे व आपण त्याच्यावर भरवसा ठेवू शकतो हे समजण्यास मुलांना मदत करा

  • अनैतिक धोके ओळखण्यास व ते टाळण्यास मुलांना मदत करा; जसे की, इंटरनेट व सोशल नेटवर्क यांवरील धोके. तसेच, लैंगिक शोषण करणाऱ्यांपासून दूर कसे राहावे हेही त्यांना शिकवा

“लहान मुलाला योग्य मार्ग निवडण्याचे शिक्षण द्या”