व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सत्कर्मं करत राहिल्यामुळे पुढे चांगलं आयुष्य जगता येईल का?

सत्कर्मं करत राहिल्यामुळे पुढे चांगलं आयुष्य जगता येईल का?

शेकडो वर्षांपासून बऱ्‍याच लोकांना असं वाटतं, की आपण जर सत्कर्मं केली आणि लोकांशी चांगलं वागलो, तर आपलं भविष्य चांगलं होईल. पूर्वेकडच्या देशांमधले बरेच लोक कन्फ्यूशियस (इ.स.पू. ५५१-४७९) नावाच्या एका विचारवंताचं तत्त्व मानतात, ज्याने म्हटलं: “इतरांनी तुमच्याशी वाईट वागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हीही त्यांच्याशी वाईट वागू नका.” *

बरेच जण काय करतात

आजही बरेच लोक असं मानतात, की तुम्हाला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल तर तुमचं आचरण चांगलं असलं पाहिजे. म्हणून ते इतरांशी आदराने वागतात, चांगल्या सवयी लावून घेतात, समाजातले जबाबदार नागरीक म्हणून वागतात आणि आपलं मन साफ ठेवायचा प्रयत्न करतात. व्हिएतनाममध्ये राहणारी लीन म्हणते, “मी नेहमी असा विचार करायचे की मी जर इतरांशी प्रामाणिकपणे वागले तर माझंही भलं होईल.”

काही जण आपल्या धार्मिक विश्‍वासामुळे इतरांशी चांगलं वागायचा प्रयत्न करतात. तायवानमध्ये राहणारा शू-यून नावाचा माणूस म्हणतो, “मला असं शिकवलं होतं की एखाद्याने त्याच्या आयुष्यात जी कर्मं केलीत, त्यांवरून मेल्यानंतर तो आनंदी असेल की यातना भोगत राहील हे ठरतं.”

अनेकांनी काय अनुभवलं आहे

हे खरं आहे की इतरांचं भलं केल्यामुळे आपलंही भलं होतं. पण बऱ्‍याच जणांनी अनुभवलं आहे, की असं नेहमीच होत नाही. हाँगकाँगमध्ये राहणारी शीऊ पिंग नावाची एक स्त्री म्हणते, “मी माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायचा आणि चांगलं ते करायचा नेहमी प्रयत्न केला, पण माझा नवरा मला आणि माझ्या मुलाला वाऱ्‍यावर सोडून गेला. आपण इतरांचं चांगलं करतो तेव्हा आपलंही चांगलं होईलच असं नाही हे मी प्रत्यक्ष अनुभवलं.”

अनेकांनी असं पाहिलं आहे, की सगळेच धार्मिक लोक चांगलं वागतात असं नाही. जपानमध्ये राहणारी इत्सुको म्हणते, “मी एका धार्मिक संघटनेची सदस्य बनले आणि तिथल्या एका युवा मंचाची अध्यक्ष बनले. पण तिथली ढासळलेली नैतिकता, अधिकार मिळवण्यासाठी होणारी चढाओढ आणि मिळालेल्या वर्गणीचा गैरवापर पाहून मला धक्काच बसला.”

“मी माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायचा आणि चागलं ते करायचा नेहमी प्रयत्न केला, पण माझा नवरा मला आणि माझ्या मुलाला वाऱ्‍यावर सोडून गेला.”​—शीऊ पिंग, हाँगकाँग

श्रद्धेच्या भावनेने केलेल्या चांगल्या कामाचं चीज होत नाही असं जेव्हा काही जणांना जाणवतं, तेव्हा त्यांची निराशा होते. हीच गोष्ट व्हिएतनाममधल्या वॅन नावाच्या एका स्त्रीला जाणवली. ती म्हणते, “मी दररोज माझ्या मृत वाडवडिलांना फळं-फुलं वाहायचे आणि नैवेद्य दाखवायचे. असं केल्यामुळे पुढे मला त्यांचा आशीर्वाद मिळेल असं मला वाटायचं. पण बरीच वर्षं हे सगळं करून आणि धार्मिक रीतीरिवाज पाळूनसुद्धा काहीच उपयोग झाला नाही. माझे मिस्टर खूप अजारी पडले आणि बाहेरच्या देशात शिकत असलेली माझी तरूण मुलगी अचानक वारली.”

जर सत्कर्मं करूनसुद्धा चांगल्या भविष्याची गॅरेंटी मिळत नसेल तर मग कशामुळे मिळेल? या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी आपल्याला एका भरवश्‍यालायक मार्गदर्शनाची गरज आहे. मग ते कुठे मिळेल? याबद्दल जास्त माहिती आपल्याला पुढच्या लेखात दिली आहे.

^ परि. 2 कन्फ्यूशियसच्या शिकवणीचा लोकांवर किती प्रभाव आहे हे जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या मॅनकाईन्ड्‌स सर्च फॉर गॉड  या पुस्तकातला अध्याय ७, परिच्छेद ३१-३५ पाहा. हे पुस्तक www.dan124.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.