व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | पालक

मुलांची योग्य प्रशंसा कशी कराल?

मुलांची योग्य प्रशंसा कशी कराल?

एक समस्या

काही लोकांचं म्हणणं आहे, मुलांची कितीही प्रशंसा केली तरी कमीच आहे. तर इतरांना वाटतं, मुलांची सतत प्रशंसा केल्यानं ते गर्विष्ठ होतील, बिघडतील आणि डोक्यावर बसतील.

तुम्ही मुलाची किती प्रशंसा करता, आणि ती कशा प्रकारे करता याचा विचार केला पाहिजे. कशा प्रकारच्या प्रशंसेनं त्याला उत्तेजन मिळेल आणि कशानं नाही? सर्वात चांगला परिणाम होण्यासाठी तुम्ही त्याची योग्य प्रशंसा कशी कराल?

तुम्हाला माहीत आहे का?

मुलांची ज्या पद्धतीनं प्रशंसा केली जाते त्याचे वेगवेगळे परिणाम होतात. पुढील गोष्टींचा विचार करा:

अती प्रशंसा केल्यानं मुलांचं नुकसान होऊ शकतं. काही आई-वडील उठसूट आपल्या मुलांची प्रशंसा करत असतात. त्यांना असं वाटतं, असं केल्यानं मुलांचा आत्मविश्वास वाढेल. पण डॉ. डेव्हिड वॉल्श याबाबतीत पालकांना इशारा देतात. प्रशंसा करण्यासारखं आपण काही विशेष केलं नाही तरी मम्मी-पप्पा उगाच आपली प्रशंसा करत आहेत हे मुलांना कळतं. याचा परिणाम असा होईल की मुलांना आपल्या आई-वडिलांवर विश्वास ठेवणं कठीण जाईल. *

क्षमतेची प्रशंसा करणं चांगलं आहे. समजा तुमच्या मुलीच्या अंगी चित्रकलेचं हुन्नर आहे. तिनं ही कला जोपासावी म्हणून तिला उत्तेजन देण्यासाठी साहजिकच तुम्ही तिची प्रशंसा कराल. पण असं करण्यातही एक धोका आहे. तुम्ही केवळ तिच्या अंगी असलेल्या हुन्नराची प्रशंसा केली तर तिला असं वाटेल, की ज्या गोष्टींचं हुन्नर तिच्यामध्ये आहे त्याच गोष्टींमध्ये तिनं प्राविण्य मिळवलं पाहिजे. ‘कुठलीही नवीन गोष्ट करायला मला जमणार नाही’ म्हणून ती गोष्ट करायला ती तयार होणार नाही. ती असा विचार करेल, ‘एखाद्या गोष्टीसाठी मला मेहनत घ्यावी लागत असेल तर मला नाही करायची ती गोष्ट. मी त्यासाठी कष्ट का करू?’

प्रयत्नांची प्रशंसा करणं उत्तम आहे. मुलांमध्ये असलेल्या हुन्नराबद्दलच केवळ त्यांची प्रशंसा करण्याऐवजी त्यांनी घेतलेल्या मेहनतीची आणि दाखवलेल्या चिकाटीची तुम्ही प्रशंसा केली तर ते एक महत्त्वाची गोष्ट शिकतील. ती म्हणजे एखाद्या कामात कौशल्य मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते आणि धीर धरावा लागतो. अशा मुलांबद्दल लेटिंग गो विथ लव अॅण्ड कॉन्फिडेंस या पुस्तकात म्हटलं आहे, “ते आपलं ध्येय गाठण्यासाठी मनापासून मेहनत करतात आणि जरी लगेच यश मिळालं नाही, तरी ती शिकण्यातील एक पायरी आहे असं ते समजतात.”

तुम्ही काय करू शकता

केवळ हुन्नराची नाही तर प्रयत्नांची प्रशंसा करा. मुलाची प्रशंसा करताना, “चित्रकला तर तुझ्या रक्तातच आहे,” असं म्हणण्याऐवजी, “हे चित्र काढण्यासाठी तू खूप मेहनत घेतली,” असं म्हणा. दोन्ही वाक्यं प्रशंसेची आहेत. फरक इतकाच की आधीच्या वाक्यातून नकळत तुम्ही असं सुचवत असता, की मुलामध्ये जर एखाद्या गोष्टीचं आधीपासून हुन्नर असेल तर त्यातच तो प्राविण्य मिळवेल.

पण तुम्ही त्याच्या प्रयत्नांची आणि मेहनतीची प्रशंसा करता तेव्हा सराव केल्यानं कौशल्य मिळवता येतं हे तुम्ही त्याला शिकवता. यामुळं मग मूल नवीन गोष्टी शिकण्यासाठी आत्मविश्वासानं पुढं येतं.—बायबलचं तत्त्व: नीतिसूत्रे १४:२३.

अपयशाला तोंड द्यायला मदत करा. हुशार लोकांकडूनसुद्धा चुका होतात. काही तर वारंवार चुकतात. (नीतिसूत्रे २४:१६) पण चूक झाल्यावर ते त्या अनुभवातून शिकतात, शहाणे होतात आणि जीवनात पुढं जातात. तुमच्या मुलानं हाच सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा म्हणून तुम्ही त्याला कशी मदत करू शकता?

त्याच्या मेहनतीकडे जास्त लक्ष द्या. समजा तुम्ही तुमच्या मुलीला बऱ्याचदा म्हटलं आहे: ‘तू गणितात फार हुशार आहेस,’ आणि एकदा ती गणितात नापास होते. तेव्हा तिला कदाचित वाटेल, ‘आता मला पुन्हा कधी चांगले मार्क मिळणार नाहीत, मग मी मेहनत का करू?’

पण मुलीच्या मेहनतीकडे जास्त लक्ष दिल्यानं तुम्ही तिची चिकाटी वाढवण्यास मदत करता. तुम्ही तिला आलेल्या अपयशामुळं सर्व काही संपलं नाही, पुन्हा संधी मिळेल असं शिकवता. म्हणून निराश न होता पुढच्या वेळी ती आणखी मेहनत करेल.—बायबलचं तत्त्व: याकोब ३:२.

सुधारणा करण्याची प्रेरणा मिळेल अशा प्रकारे दोष लक्षात आणून द्या. मुलाला योग्य पद्धतीनं त्याचे दोष लक्षात आणून दिले तर तो निराश होणार नाही उलट त्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा मिळेल. सोबतच तुम्ही नियमितपणे योग्य तेव्हा त्याची प्रशंसा केली तर तो सकारात्मक मनोवृत्तीनं तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी ऐकेल. त्याच्या प्रगतीमुळं त्याला आणि तुम्हालाही समाधान मिळेल.—बायबलचं तत्त्व: नीतिसूत्रे १३:४. (g15-E 11)

^ परि. 8 नो: व्हाय किड्स—ऑफ ऑल एजेस—नीड टू हिअर इट अॅण्ड वेझ पेरंन्ट्स कॅन से इट, या पुस्तकातून.