व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | पालक

मुलांना स्वतःवर ताबा ठेवायला शिकवा

मुलांना स्वतःवर ताबा ठेवायला शिकवा

एक समस्या

स्वतःवर ताबा ठेवला पाहिजे, ही गोष्टच तुमच्या सहा वर्षांच्या मुलाला माहीत नाही. त्याला एखादी गोष्ट दिसली की ती त्याला हवी असते आणि ती पण आत्ताच्या आत्ता हवी असते. त्याला राग आला की तो किंचाळतो. अशा वेळी तुमच्या मनात असे प्रश्न येतील: ‘मुलांचं असं वागणं स्वाभाविक आहे का? मोठं झाल्यावर तो सुधारेल का? किंवा, मी आत्ताच त्याला स्वतःवर ताबा ठेवायला शिकवलं पाहिजे?’ *

तुम्हाला माहीत आहे का?

आजच्या जगात ‘स्वतःवर ताबा ठेवणं’ या गोष्टीला कोणी महत्त्व देत नाही. डॉ. डेव्हिड वॉल्श आपल्या पुस्तकात असं लिहितात: “‘मनास येईल तसं तुम्ही वागू शकता,’ हे शब्द आजच्या जगातील प्रौढ लोकांच्या व मुलांच्या कानांवर सतत पडत असतात. काही लोक स्वतःला आलेले अनुभव, स्वतःचं ज्ञान आणि सल्ला इतरांना सांगून त्यांचं जीवन सुधारण्यास प्रामाणिकपणे मदत करू इच्छितात. तर काही जण, फक्त पैसा मिळवण्यासाठी लोकांना निरर्थक व चुकीचा सल्ला देतात. हे सर्वजण, हेच सांगत असतात, की आपल्या मनात येईल ती इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे.” *

कोवळ्या वयापासूनच स्वतःवर ताबा ठेवण्याचं शिक्षण देणं महत्त्वाचं आहे. काही संशोधकांनी मुलांच्या एका गटावर बऱ्याच वर्षांपर्यंत अभ्यास केला. त्यांनी चार वर्षांच्या मुलांच्या एका गटाला एकेक चॉकलेट देऊन सांगितलं की तुम्ही हे चॉकलेट आत्ता लगेच खाऊ शकता किंवा थोडा वेळ थांबून नंतर खाऊ शकता. नंतर खाल्लं तर तुम्हाला आणखी एक चॉकलेट दिलं जाईल. ज्या मुलांवर हा अभ्यास करण्यात आला होता, ती आता मोठी झाली होती आणि त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यांच्या बाबतीत असं दिसून आलं, की जी मुलं वयाच्या चवथ्या वर्षी स्वतःवर ताबा ठेवू शकली होती ती इतर मुलांपेक्षा उत्तम ठरली. भावनिक रीत्या, सामाजिक रीत्या व त्यांच्या शालेय अभ्यासात ती संतुलित होती.

स्वतःवर ताबा ठेवायला शिकवलं नाही तर मोठी किंमत मोजावी लागू शकते. जीवनातील अनुभवांनुसार मुलाच्या मेंदूचा विकास होत असतो. याचा काय अर्थ होतो ते डॉ. डॅन किन्डलन समजावून सांगतात. ते म्हणतात, की तुम्ही जर तुमच्या मुलांना, त्यांना वाटेल तसं वागू दिलं, त्यांना थांबून राहण्यास, मनात येणारी प्रत्येक इच्छा पूर्ण न करण्यास व मोहांचा प्रतिकार करण्यास बालपणापासूनच शिकवलं नाही, तर ती मोठी झाल्यावर मनानं खंबीर कधीच होणार नाहीत. *

तुम्ही काय करू शकता

आधी स्वतः तसं वागा. स्वतःवर ताबा ठेवण्याच्या बाबतीत तुम्ही कसे आहात? तुमचं मूल तुम्हाला ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यावर चिडताना, दुकानात रांगेत उभं राहावं लागतं तेव्हा रांग तोडून पुढं जाताना किंवा दुसरे बोलत असतात तेव्हा त्यांचं बोलणं मधेच तोडताना पाहतं का? आपल्या मुलाला स्वतःवर ताबा ठेवायला शिकवायचं असेल तर आधी स्वतः तसं वागा. त्याला शिकवण्याचा हाच सर्वात उत्तम मार्ग आहे, असं डॉ. किन्डलन त्यांच्या पुस्तकात लिहितात.—बायबलचं तत्त्व: रोमकर १२:९.

स्वतःवर ताबा ठेवला नाही तर काय परिणाम होतील ते त्याला सांगा. मुलाचं वय लक्षात घेऊन त्यानुसार त्याला, स्वतःवर ताबा ठेवल्यानं काय फायदे होऊ शकतात आणि ताबा न ठेवल्यानं काय तोटे होऊ शकतात ते पाहण्यास मदत करा. जसं की, तुमच्या मुलाला दुसऱ्याच्या वागण्याचा राग आला असेल तर त्याला स्वतःला हे प्रश्न विचारायला सांगा: ‘मी जर जशास तसं वागलो तर यानं मला फायदा होईल, की उलट माझंच नुकसान होईल? मला राग येतो तेव्हा मी काय करू शकतो? राग येतो तेव्हा थोडा वेळ शांत राहिल्यानं माझं डोकं शांत होईल का? तिथून निघून गेल्यानं परिस्थिती सुधारेल का?’—बायबलचं तत्त्व: गलतीकर ६:७.

तुमच्या मुलाला उत्तेजन द्या. तुमचा मुलगा आत्मसंयम दाखवतो तेव्हा त्याची प्रशंसा करा. आपल्या भावनांना आवर घालणं नेहमीच सोपं नसेल पण असं केल्यास तो मनानं दुर्बल नव्हे तर खंबीर आहे हे दिसून येईल. बायबलमध्ये म्हटलं आहे: “जर माणूस स्वतःवर ताबा मिळवू शकत नसेल तर तो तटबंदी मोडून पडलेल्या शहरासारखा आहे.” (नीतिसूत्रे २५:२८, ईझी-टू-रीड व्हर्शन) पण “ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ” आहे.—नीतिसूत्रे १६:३२.

सराव करा. मुलांबरोबर काही खेळ खेळा. या खेळांना, “तू काय करशील,” “योग्य आणि अयोग्य निवडी,” किंवा तुम्हाला जे आवडेल ते नाव द्या. या खेळांत, वेगवेगळ्या प्रसंगी आपण जी प्रतिक्रिया दाखवतो ती “योग्य” होती किंवा “अयोग्य” होती ते नाटकाच्या रूपात सादर करा. प्रत्येक वेळा काही तरी नवीन खेळ खेळायचा प्रयत्न करा. हा खेळ मजेशीर करण्यासोबतच मुलाला त्यातून धडा शिकता यावा म्हणून हवं तर तुम्ही बाहुल्यांचा, चित्रांचा किंवा दुसऱ्या कुठल्याही पद्धतीचा उपयोग करू शकता. उतावळं होऊन वागण्यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवून वागल्यास नेहमीच फायदा होतो ही गोष्ट मुलांच्या मनावर बिंबवण्याचा तुमचा हेतू असला पाहिजे.—बायबलचं तत्त्व: नीतिसूत्रे २९:११.

सहनशील असा. “बालकाच्या हृदयांत मूर्खता जखडलेली असते,” असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (नीतिसूत्रे २२:१५) त्यामुळं, तुमच्या मुलाला शिकवताना सहनशील असा. एका रात्रीत त्यानं स्वतःवर ताबा ठेवायला शिकलं पाहिजे, अशी अपेक्षा करू नका. टीच युअर चिल्डरन वेल नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे: “ही शिकवण्याची प्रक्रिया मंद गतीनं चालत असली तरी त्यात तुम्हाला प्रगती दिसून येईल. मुलात बदल होताना दिसतील, तर कधीकधी तो पूर्वीसारखा वागू लागेल, पण तो हळूहळू स्वतःवर ताबा ठेवायला शिकेल. जे मूल लहानपणापासूनच स्वतःवर ताबा ठेवायला शिकतं ते बारा वर्षांचं झाल्यावर, ड्रग्जचा नकार द्यायला किंवा चवदा वर्षांचं झाल्यावर सेक्सला नकार द्यायला शिकेल.” ▪ (g15-E 08)

^ परि. 4 लेखात आम्ही मुलाला उद्देशून बोलत असलो तरी, लेखातील सल्ला मुलीलादेखील लागू होतो.

^ परि. 6 नो: व्हाय किड्स—ऑफ ऑल एजेस—नीड टू हिअर इट अॅण्ड वेझ पेरंन्ट्स कॅन से इट, या पुस्तकातून.

^ परि. 8 टू मच ऑफ अ गुड थिंग—रेझिंग चिल्डरन ऑफ कॅरेक्टर इन अॅन इंडल्जंट एज या पुस्तकातून.